वनविभागाचे वृक्षतोडीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
★वृक्षतोडीची तक्रार करून देखील वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष – डॉ.गणेश ढवळे
बीड | प्रतिनिधी
शासन कोट्यवधींचा रूपये वृक्षलागवड व संगोपनासाठी खर्च करत असताना २५ वर्षांपूर्वीची झाडे तोडल्याची लेखी तक्रार देऊन ३ दिवस झाले तरी वनविभागातील अधिकारी, कर्मचारी साधा स्थळपंचनामा करण्यासाठी सुद्धा आले नसल्याने वनविभागातील आधिकारी वृक्षतोडी कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी करत कारवाईची मागणी केली आहे.
मौजे.कानडीघाट ता.जि.बीड येथील शेतकरी लक्ष्मण ज्ञानोबा कवडे आणि हनुमंत ज्ञानोबा कवडे यांनी दि.०६ जुलै गुरुवार रोजी त्यांच्या शेतातील २५ वर्षे वयोमान असणारी चिंचेची व कडुनिंबाची १० झाडे विनापरवानगी तोडण्यात आली असून संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तक्रार जिल्हाधिकारी,वन विभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना केली असुन ३ दिवस झाले तरी कोणीही स्थळपंचनामा व चौकशी साठी आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
★मराठवाड्यात सर्वात कमी वनक्षेत्र बीड जिल्ह्यात असुन सुद्धा वनविभागाचे दूर्लक्ष – डॉ.गणेश ढवळे
मराठवाड्यात बीड आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र असुन बीड जिल्ह्यात केवळ २.५ टक्के वनक्षेत्र असुन त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व वृक्षसंगोपन करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो मात्र त्याठिकाणी केवळ फोटोसेशन व जाहिरात बाजी करुन दिशाभूल केली जाते.याचवेळी वृक्षतोडीची लेखी तक्रार देऊनही दखल न घेणा-या वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल तिव्र नाराजी दिसून येत आहे.