अमरनाथ गुहेत भगवान शिवने पार्वतीला सांगितले अमरत्वाचे रहस्य!
* नैसर्गिकरीत्या तयार झाले शिवलिंग ; बाबा अमरनाथाचे दर्शन सुरू!
[ लोकवास्तव विशेष ]
शनिवार, 1 जुलैपासून भाविकांना बाबा अमरनाथच्या दर्शनाला जाता येणार आहे. देशभरातील शिवभक्तांसाठी शिवशंकराचे अनेक तिर्थस्थान आहेत, मात्र सर्वात महत्त्वाचे तिर्थस्थान म्हणून अमरनाथ गुहेतील शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. शिवशंकराच्या या तिर्थाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. श्रीनगरपासून अमरनाथ गुहा 145 किमी अंतरावर हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये आहे. या गुहेची उंची 150 फुट आहे, तर रूंदी 90 फुट लांब आहे. येथेच शिवशंकराने पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितल्यामुळे या तिर्थाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हिमालयाच्या पर्वत रांगामध्ये 4000 मीटर उंचीवर शिवलींग आहे. चोहीकडे फक्त बर्फ पाहायला मिळतो. या गुहेत निर्माण होणारे शिवलिंग हे बर्फापासून तयार होते. हे शिवलिंग नैसर्गिक स्वरूपाचे असून ठरावीक काळात तयार होते. ज्या गुहेत बर्फापासून शिवलिंग तयार होते, त्या गुहेतील बर्फ मात्र कच्चा आहे. हा बर्फ हातात घेतले तरी विरघळतो. शिवलिंग ज्या बर्फापासून तयार होते तो बर्फ मात्र मजबुत असतो.गुहेतील शिवलींगावर सतत बर्फाचे थेंब पडत असतात. यामुळे जवळपास दहा फुट उंचीचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगांची उंची चंद्राच्या आकाराबरोबर कमी जास्त होत राहाते, हे एक आश्चर्य. अमावास्याच्या दिवशी या शिवलिंगाचा आकार कमी झालेला असतो.
* भगवान महादेवांनी देवी पार्वतीला सांगितले होते अमरत्वाचे रहस्य!
आख्यायिकेनुसार, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना त्यांच्या अमरत्वाचे कारण विचारले. तेव्हा भोलेनाथांनी त्यांना अमर कथा ऐकण्यास सांगितले. अमर कथा ऐकण्यासाठी पार्वती यांनी आशा जागेचा शोध सुरू केला. जिथे अमर होण्याचे रहस्य इतर कोणी ऐकू शकणार नाही. अखेर त्या अमरनाथ गुहेत पोहोचल्या.अमरनाथ गुहेत पोहोचण्यापूर्वी भगवान शिव यांनी पहलगाममध्ये नंदी, चंदनवाडी येथे चंद्र, शेषनाग तलावाच्या काठी नाग, महागुण पर्वतावर गणेश, पंचतर्णीमध्ये पाच तत्वे (पृथ्वी, पाणी, वायू, अग्नि आणि आकाश) यांना सोडलं.पार्वतीसोबत अमरनाथ गुहेत पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांनी कालाग्नीला गुहेभोवतीच्या सर्व सजीवांचा नाश करण्याचा आदेश दिला. जेणेकरून इतर कोणीही अमर कथा ऐकू नये.यानंतर शिव यांनी पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली. पण, यावेळी कबुतराच्या जोडीनेही ही कथा ऐकली आणि ते अमर झाले. आजही अनेक भाविक अमरनाथ गुहेत कबुतरांची जोडी पाहिल्याचा दावा करतात. इतक्या उंच आणि थंड परिसरात या कबुतरांचे जगणे थक्क करणारे आहे.शेवटी, शिव आणि पार्वती अमरनाथ गुहेत बर्फापासून बनवलेल्या लिंगाच्या रूपात प्रकट झाले. जे आजही नैसर्गिकरित्या निर्माण होते. लिंगाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात.
* प्रथम एका गुराख्याने ही गुहा पाहिली
गुहेचा इतिहास खूप जुना आहे, पण अमरनाथ गुहा तीन-चारशे वर्षांपूर्वी एका गुराख्याने शोधून काढली होती. या संदर्भात अशी एक मान्यता आहे की, या भागातील एका गुराख्याला एका साधूने कोळसा भरलेली पिशवी दिली. जेव्हा गुराखी कोळशाची पिशवी घेऊन त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की कोळशाऐवजी त्या पिशवीत सोने होते. हा चमत्कार पाहून गुराखी पुन्हा साधूच्या शोधात या भागात पोहोचला. साधूचा शोध घेत असतानाच गुराखी अमरनाथ गुहेत पोहोचला. गुहेतून परत आल्यावर गुराख्याने सर्व घटना लोकांना सांगितली. अमरनाथ गुहा हे देवस्थान मानून लोकांनी येथे पूजा करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून बाबा अमरनाथच्या गुहेत जाऊन पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे.