भाजप आण्णा, घड्याळ काका, अपक्ष साहेब तर तुतारी कोण ?
★आष्टी विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार का तिरंगी ?
★तुतारी नवीन चेहऱ्याच्या हाती जाण्याची शक्यता!
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाच्या उमेदवारीवरून चांगलीच चुरस वाढलेली पाहायला मिळत आहे. भाजपकडून सुरेश आण्णा धस राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे काका अपक्ष म्हणून भीमराव धोंडे साहेब तर तुतारी कडून कोण ? अशी चर्चा सुरू असली तरी तुतारी नवीन उमेदवाराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य जनतेमधून तुतारीचा उमेदवार नवीनच येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. महायुती कडून आण्णा, काका व साहेब इच्छुक असल्याने आघाडी कडून फक्त तुतारीचाच उमेदवार मिळणार असल्याने उमेदवाराची कसून चाचपणी सुरू आहे, त्यामुळे तुतारीचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा सुरू आहे.
महायुतीकडून अण्णा, काका, साहेब हे तीन उमेदवार तर आघाडीकडून फक्त तुतारीचाच एकच उमेदवार येणार असल्याने आष्टी विधानसभेची निवडणूक तुतारी साठी सोपी मानली जात आहे. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर बाकीचे दोन उमेदवार काय करणार यावरही चित्र बरेच स्पष्ट होणार आहे. तसेच तुतारीचा उमेदवार कोण यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.महायुती आघाडीचे जरी उमेदवार फायनल झाले तरीदेखील मनोज जरांगे पाटील काय करणार यावर सर्वात महत्त्वाचा निर्णय अवलंबून असणार आहे, अशा चर्चा आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात पारापरावर सुरू असल्याच्या ऐकायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 17 ऑक्टोबर रोजी सराटी अंतरवाली येथे इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं या बैठकीत आष्टी मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित राहिल्याचे सुद्धा ऐकायला मिळत आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोबर रोजी आपला निर्णय जाहीर करू आणि लढायचं की पडायचं ते ठरवू त्यामुळे समाज बांधव 20 तारखेला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं सर्व मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल असेही चर्चेतून समोर येत आहे.
★पवारसाहेब तुतारीची गुगली कशी टाकणार ?
आष्टी मतदारसंघ हा शरदचंद्र पवार यांच्या महत्त्वाच्या लिस्टमध्ये असल्याने या ठिकाणी तुतारीचा उमेदवार उशिरा जाहीर होणार परंतु महायुतीच्या उमेदवाराच्या तोडीस तोड मिळणार असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे तुतारीचा उमेदवार पवार साहेबांच्या मनात अगोदरच फिक्स झाल्याच सुद्धा बोलल जात असल्याने अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता लागली आहे की तो उमेदवार कोण ? परंतु त्यासाठी आपल्याला वाट पहावी लागणार यात शंका नाही.
★महायुतीचा उमेदवार ठरल्यावर तुतारीचा उमेदवार ठरणार!
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा सर्वात महत्त्वाची आणि सर्वांच्याच लिस्टवर असल्याने येथील उमेदवार हा खूप विचारपूर्वक दिला जाणार आहे. भाजपकडून सुरेश आण्णा प्रबळ दावेदार मानले जातात तर भीमराव धोंडे साहेबांनी निवडणूक लढवण्याची खून गाठ बांधली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांची महायुतीकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणारच कारण की ते विद्यमान आमदार आहेत अशाही चर्चा आहेत. या तीन पैकी युतीचा उमेदवार कोण त्यावर ठरणार तुतारीचा उमेदवार त्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका सर्वांनाच घ्यावी लागणार आहे..
★शरदचंद्र पवार साहेबांनी ठरवलं!
महायुतीकडून भाजपची उमेदवारी सुरेश आण्णा धस यांना जाहीर झाली तर त्यांच्याविरुद्ध तुतारीचा उमेदवार कोण घ्यायचा हे ठरवलं आहे, तसेच राष्ट्रवादीचे उमेदवारी विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना मिळवली तर त्यांच्याविरुद्ध कोण द्यायचा हे देखील ठरवलं आहे, तसेच भीमराव धोंडे यांना जर मिळाली तर त्यांच्याविरुद्ध कोण द्यायचा हे देखील ठरवलं आहे. एकूणच महायुतीचे तीन उमेदवार आहेत त्या तीनही उमेदवाराच्या विरुद्ध कोण उमेदवार द्यायचा हे तीनही उमेदवार पवार साहेबांनी ठरवले आहेत आता फक्त महायुतीच्या तीन पैकी एक उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला की लगेच तुतारीचा उमेदवार जाहीर होणार यात शंका नाही…