सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भाषा विभागातील एका विद्यार्थ्याच्या लेखणीतून साकारले श्रीगोंदा तालुक्यातील महामानव बाबा आमटे सामाजिक संस्थेचे संस्थागीत!
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट असे संबोधण्यात येते. या विद्यापीठात अनेक गुणवंत विद्यार्थी शिकत असतात. आपले कला गुण विकसित करत असतात. नुकतेच विद्यापीठातील इंग्रजी विभागातील कृष्णा घोलप या विद्यार्थ्याने लिहिलेल्या काव्यरचनेस अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीगोंदा तालुक्यातील महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेचे ‘संस्थागीत’ ठरण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. विद्यापीठातील शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. विद्यापीठात विद्यार्थी फक्त अकॅडमिक शिक्षणच घेत नाहीत तर, त्याचबरोबर आपल्या कलागुणांना देखील योग्य न्याय देतात, आपल्या कलागुणांची, छंदांचीही जोपासना आणि अभिवृद्धी करतात, याचेच हे एक उदाहरण आहे. नुकताच विद्यापीठाचा अमृत महोत्सव पार पडला. या अमृत महोत्सवातूनच उपरोक्त संस्थागीत लिहिण्याची संकल्पना व प्रेरणा मिळाली असेही कृष्णा घोलप यांनी सांगितले. विद्यार्थी दशेतच कृष्णा घोलप यांच्या काव्यरचनेस महाराष्ट्रातील एका सामाजिक संस्थेचे संस्था गीत ठरण्याचा बहुमान मिळतो आहे; यातून विद्यापीठाच्या नावलौकिकात भरच पडत आहे. या कार्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तसेच विद्यापीठाच्या भाषा व साहित्यप्रशालेचे संचालक प्रभाकर देसाई यांनी कृष्णाचे कौतुक केले. तसेच त्यास शुभेच्छाही दिल्या.