★बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराचा कारनामा
बीड | प्रतिनिधी
शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये चकलांबा पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे नोंद झाले. यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराने पाच हजार रुपयांची लाच घेतली. त्याला पकडताच घेतलेले पाच हजार रुपये त्याने ताेंडात टाकले. चावून ते गिळण्याआधीच एसीबीच्या पथकाने पकडले. नाक दाबून तोंड उघडत त्याच्या तोंडातील रोख पाच हजार रुपये काढून जप्त केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.
मारुती रघुनाथ केदार (वय ३४, रा. चकलांबा, ता. गेवराई) असे कारवाई झालेल्या हवालदाराचे नाव आहे. केदार हा चकलांबा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार व त्यांचे चुलते यांच्यात शेतीच्या वादातून भांडण झाले होते. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवालदार केदार याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंगळवारी सकाळीच संबंधिताने छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली. लगेच पथक चकलांबा येथे आले. खात्री करून पाच हजार रुपयांची लाच घेताच केदार याला पकडले. त्याच्याविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयमाला चव्हाण, अमोल धस यांच्यासह पोह.सिंदकर, युवराज हिवाळे, अंमलदार शिंदे यांनी केली.
★तक्रारदार दिव्यांग असतानाही त्रास
तक्रारदार हा दिव्यांग आहे. तरीही त्याला वारंवार पोलिस ठाण्यात बोलावून घेत मारुती केदार याने त्याला त्रास दिला. तुझा जामीन तहसीलदार यांच्याकडे करायचा आहे. याला पैसे लागतात. त्यांनी जर जामीन नाकारला तर तुला जेलमध्ये जावे लागेल, अशी भीती केदारने तक्रारदाराला दाखवली होती. याच त्रासाला वैतागून एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती.
★ठाणेदाराचीही होणार चौकशी
चकलांबा पोलिस ठाणे कायम वादात असते. येथील ठाणेदार सपोनि नारायण एकशिंगे यांच्या वाळूच्या कारवाया वादात असतात. एखादी कारवाई केली की वरिष्ठांकडून वाहवा मिळवण्यासाठी बोभाटा केला जातो. प्रत्यक्षात आतून वेगळाच उद्योग चालतो. आता या प्रकरणातही ठाणेदार एकशिंगे यांचा सहभाग आहे का? याची चौकशी एसीबीकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.