★उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
★मुंबईतील महायुतीच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
मुंबई : वृत्तांत
पंतप्रधानांना शरीफांच्या केकची आठवण होतेय, महायुतीच्या मंचावर जे लोक होते त्यांना त्यांची दिशा नाही. ते भरकटलेले लोक आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मनी वसे ते स्वप्नी दिसे असं भाजपाच्या मनात पाकिस्तान आहे. मोदींना अजूनही नवाज शरीफांच्या केकची आठवण येते. एखादं मुलं भुकेने रडत असेल तर त्याला भुताच्या गोष्टी सांगून शांत बसवता येत नाही. गेल्यावेळी पुलावामा हल्ला झाला त्यावर सत्यपाल मलिक यांनी जे भांडे फोडले त्यावर भाजपाकडे उत्तर नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपानं तो हल्ला घडवून आणला होता का? पाकिस्तानचा झेंडा मी बघितला नाही. मुलभूत प्रश्नापासून विचलित करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी असे मुद्दे आणले जातात. चीन भारतात घुसायला लागलाय. अरुणाचलमध्ये गावांची नावे बदलली. भाजपाला तोडा फोडा आणि राज्य करा यावर भर आहे असं त्यांनी सांगितले.तसेच भाजपा येणाऱ्या काळात संघालाही नकली आरएसएस म्हणतील, आरएसएसवर बॅन भाजपा लावेल. महायुतीच्या मंचावर जे लोक होते, त्यांना आपली दिशा ठरवावी लागेल. भरकटलेले लोक आहेत. कुठे जायचे हे माहिती नाही. त्या लोकांमध्ये संवेदना नाही. काहीही बोलत आहेत. फक्त मुस्लिमांबाबत नाही. तर मोदींनी मलाही नकली संतान म्हटलंय. तारे दाखवायलाही अक्कल लागते पण जे व्यासपीठावर होते त्यांना ते मंजूर होते का?. राज ठाकरेंच्या बोलण्याकडे मोदींनी लक्ष दिलं नाही. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर मी त्यांच्या विधानाला महत्त्व का देऊ? मुस्लीम सोबत आहेत असं बोलणाऱ्यांना मोदींनी उत्तर भारतीय, जैन समाजाबाबत विचारावं असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. दरम्यान, जे देशभक्त शब्दावर आक्षेप घेतायेत, ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील. देशभक्त असणं हा गुन्हा आहे का? आमच्यावर पाकिस्तानचा झेंडा नाचवणारे आरोप करणारे देशद्रोही आहोत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशद्रोही म्हणतात, आंदोलनाला अराजकता म्हणणारे आणि माझ्या देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे हे देशद्रोही आहेत असा पलटवारही उद्धव ठाकरेंनी केला.
★पंतप्रधानपदासाठी मोदींचा चेहरा चालत नाही
भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाही, मोदी ब्रह्मदेव नाहीत आमच्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत. निकालानंतर आम्ही ठरवू. प्रत्येक वेळी निवडणुकीत मोदी बोहल्यावर चढतात. आता तो चेहरा चालत नाही. भाजपाची पंचाईत अशी झालीय निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने ते पंतप्रधानपदाचा चेहरा बदलू शकत नाही असा टोला ठाकरेंनी भाजपाला लगावला.