हेवढा ” खोटा अहंकार ” येतो तरी कुठून ?
थोर महापुरुषांच्या विचाराने आणि संतांच्या प्रबोधनाने पवित्र झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. संबंध महाराष्ट्रातील जनतेने या महापुरुषांच्या व संतांच्या विचाराला कुठेही गालबोट लागणार नाही याचं भान ठेवून खबरदारी ने वागलं पाहिजे.
या महाराष्ट्राच्या भूमीचा एक गुणधर्म असाही आहे आपले बरेच संत फार उच्च शिक्षित नसले तरी ,ते विवेकनिष्ठ,तत्त्वज्ञानात्मक क्षमता, कर्मकांड विरोधी ,अंधश्रद्धा निर्मूलन ,जाती अंतीचा लढा ,अहंकार शून्य व मानव हिताच्या उच्चतेजी चे आकलन त्यांच्याकडे असत .त्यापैकी एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावेळी म्हणले होते की ” काळ बदलला की शिक्षणाची पद्धती बदलतात . आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे आणि ती म्हणजे , प्रत्येकाने आपलं काम इमानदारीने करावे सर्वांनी आपल्या मर्यादाचे भान ठेवावे”.
तुकडोजी महाराज यांचा हा अनमोल संदेश आजच्या युगातील सर्वांनी अभिप्रीत. तसेच कसल्याही प्रकारचा गर्विष्ठ अहंकार शून्य केला पाहिजे. पण इथे उलटच आहे. शासकीय व प्रशासकीय सरकारी नौकऱ्या किंवा राजकीय पद किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाल्यावर अंगात पांढरे वस्त्र चढवले की ऊर्मठपणा, खोटा अहंकार त्यापेक्षा चार पट जास्त चढतो. इथे तुम्ही फक्त जनतेचे सेवक आहात, म्हणून तुमच्या अंगी पांढरे शुभ्र किंवा खादी वस्त्र परिधान करत असतात. त्याच्या आडून खोटा अहंकार बाळगू नये. आपल्या महाराष्ट्रातील संतांनी खोटा अहंकार बाळगणाऱ्यांना खडे बोल सुनवलेत तुकोबा म्हणतात “कहे तूका मैं ताको दास ! नहीं सिरभार चलावे पास!! “अर्थात जो आपल्या डोक्यावर अहंकाराचं ओझं वागवत नाही त्याचा मी सेवक आहे. ही फार मोठी गोष्ट आहे की गर्व अहंकार नसणाऱ्यांची सेवा संत सुद्धा करतात. लोक थोडी मोठी झाले की लगेच अहंकार का आणि कशामुळे येतो हेच कळायला मार्ग नाही पण तो इथेच जिरतो ही मात्र शंभर टक्के खरे आहे.
मानावया जग व्हावी द्रव्यमाया। नाही हे माझिया जीवा॥ सगळ्या जगाने मलाच मान दिला पाहिजे आणि पैशांची माया जवळ भरपूर जमवली पाहीजे असा अहंकारी इच्छा मला नाही. कारण मान पैसा खोटा अहंकार दुःखांना जन्म देतात असे तुकाराम महाराज म्हणतात. तुकोबा सारखे ठरविल्यास त्याच्यापासून सुटका होऊ शकते.आणि अलीकडे तर अजून वेगळ्याच विषयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर खोटारडा अहंकारवृत्ती पाहायला मिळते! अताचे सद्याचे थोतांड बुवा बाबा महाराज या मंडळींनी आपली संतांची संस्कृती बाजूला ठेवून वेगळेच पद्धतीचं जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर विष ओकण्याचं काम केल्याच आपण सर्वांनीच मोबाईलच्या माध्यमातून पाहिले असेल. गळ्यात माळ आणि कपाळी टिळा लावल्याने कोण शुद्ध होत नाही तर त्यासाठी समाजाच्या प्रती सद् सद् विवेकबुद्धेने निर्मळ स्वच्छ मनाने दिन – दुबळ्या गोर – गरीब अंधळ्या – पांगळ्या लोकांची निस्वार्थ सेवा केली तरच खरा परमात्मा तिथेच मिळतो असे तुकोबा म्हणतात ” जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तिथेची जाणवा ॥ देखाव्यासाठी तर कोणीही काहीपण करेल त्याला काही अर्थ नाही म्हणून राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी शेलक्या शब्दांमध्ये आपल्या वाणीतून संबोधित करतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशाने भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे!
सर्व संतांची आणि महापुरुषांच्या विचाराची गाठ बांधली तर सर्वांची एकच शिकवण माझ्या वाचनात निदर्शनात येते ती म्हणजे गर्विष्ठपणा, खोटा अहंकार सोडून कोणी कोणाचं हिसकावून खाऊ नये स्वच्छ, निर्मळ, प्रांजळ, प्रेमाने,आदराने ,विवेकाने एकामेंकाप्रती सहानुभूतीने माणुसकीने जगा आणि जगू द्या. हेच महत्त्वाचे संदेश थोर महापुरुषांनी संतांनी दिले आहेत त्याचं आचरण सध्याच्या काळामध्ये होणे अत्यंत गरजेचे आहे याच हेतून हे लिहिण्याचं कारण होतं….
लेखक : अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ता कुसळंब.