पुणे – अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी अनेक वेळा स्वबळावर त्यात्या राज्यांत सत्ता मिळवली आहे, पण शरद पवारांना मोठी लोकप्रियता व त्यांचा स्वताचा वैयक्तिक प्रभाव असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वबळावर राज्यात एकदाही सत्ता मिळू शकलेली नाही.
मध्यंतरी अजित पवारांनीही या विषयी खंत व्यक्त केली होती. त्या विषयावर शरद पवार यांनीच पत्रकारांशी अनौपचारीक गप्पांच्या दरम्यान तपशीलवार विश्लेषण करताना महाराष्ट्रातील मतदारांचे कॉस्मॉपॉलिटन स्वरूप हे त्याचे एक मुख्य कारण असल्याचे नमूद केले.
ते म्हणाले की महाराष्ट्रात आज बाहेरील राज्यातून आलेल्यांचा प्रमाण अधिक आहे.
कोकण सारख्या भागात आंब्याच्या पिकाच्या धंद्यात किंवा नाशिक सारख्या भागात द्राक्षांच्या पिकाच्या व्यवसायात बाहेरून आलेल्या लोकांचे मोठे प्राबल्य निर्माण झाले आहे. मासेमारीच्या व्यवसायातही कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोक आले आहेत. मुंबई सारख्या शहरी भागातील वस्तीलाही खूप आधीपासूनच कॉस्मापॉलिटन स्वरूप आहे. राज्यातल्या अन्य भागातही अशीच स्थिती आहे. येथील मतदार एकजिनसी नाही. हे त्याचे एक मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की त्याउलट तामिळनाडुत बहुतांशी तामिळी, केरळात बहुतांशी मल्याळम एकजिनसी समाज राहतो. तेथे ते त्यांची स्वतंत्र राजकीय संस्कृती जपतात पण महाराष्ट्राचे स्वरूप मात्र कॉस्मॉपॉलिटन राहिले आहे. त्यामुळे येथे वैयक्तिक स्वरूपात एकहाती सत्ता मिळणे अवघड असते असे नमूद करतानाच ते म्हणाले की महाराष्ट्रात आम्ही एकट्याच्या जीवावर 60-70 जागा निवडून आणतो, दुसऱ्या कोणालाही व्यक्तीगत स्वरूपात एवढे यश मिळालेले नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणले.
यावेळी पवारांनी अनौपचारीक गप्पांच्या ओघात अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने व काही प्रसंगी मिष्कीलीनेही उत्तरे दिली. विरोधी ऐक्याच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की आज सध्याच्या सरकारच्या विरोधात एकत्र येण्याची बहुतेक पक्षांची मानसिकता आहे पण नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न आहे. त्यावर बंगळुरूला येत्या 13 तारखेला होणाऱ्या बैठकीत निश्चीत स्वरूप येईल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची उंची वाढत आहे, कर्नाटकात कॉंग्रेसला मिळालेल्या यशात त्यांच्या भारत जोडो यात्रेचाही निश्चीत काही वाटा आहे असे त्यांनी नमूद केले.
राजकीय आयुष्यात पवारांनी मोठाच पल्ला गाठला आहे, त्याला यशवंतराव चव्हाणांचा आपल्यावर पडलेला व्यक्तिगत प्रभाव हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. आजही आपण रात्री बाराला झोपून सकाळी सहा वाजता उठतो, द्रव स्वरूपाचे अन्न घेतो वगैरे तपशीलही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नमूद केला. गप्पांच्या ओघात फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचाही विषय उपस्थित झाला. त्याविषयाचाही काही तपशील त्यांनी सादर केला. जे काही लोक तिकडे गेले होते ते सगळेच्या सगळे काही तासांतच परत आल्याचे त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरेंविषयी लोकांमध्ये मोठी सहानुभूती आहे आणि त्याचा लाभ महाविकास आघाडीला होईल असेही ते म्हणाले.