★दहा लाखाचा सभामंडपासह वनविभागाची जमीन मिळुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
आष्टी | प्रतिनिधी
तालुक्यातील ब्रम्हगांव येथिल जागृत देवस्थान असलेल्या श्रृंगेरी देवीचे आ. बाळासाहेब आजबे यांनी नवरात्र निमित्त आज दि. 17 रोजी दर्शन घेऊन आरती केली. यावेळी वन विभागाकडून जमीन मिळवून देऊ तसेच भाविकांच्या सोयीसाठी शृंगेरी देवी येथे दहा लाख रुपयांचा सभामंडप देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवी देवस्थान येथे नवरात्र निमित्त उत्सव चालू आहे. या उत्सवात लाखो भाविक हजेरी लावीत असतात. यातच आज आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे यांनी दर्शन घेतले व देवीची आरती केली. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार दरम्यान संपन्न झालेल्या कार्यक्रमात श्रृंगेरी देवी देवस्थानच्या मालकीची दुसरीकडे असलेली जमीन वन विभागाला देऊन त्या बदल्यात श्रृंगेरी देवी देवस्थान लगत असलेली वन विभागाची जमीन देवस्थानला मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच देवस्थानावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर दशलक्ष रुपयांचा सभामंडप येथे उभा करू असे आश्वासन आ. बाळासाहेब आजबे यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विजय हराळ, उपाध्यक्ष सुनील सानप, सचिव एडवोकेट अशोक गवारे, ब्रह्मगावचे सरपंच रोहिदास पवार, उपसरपंच अशोक सानप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सोपानराव पवार, माजी सरपंच संदिप पानसांडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सानप, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सानप, भाऊसाहेब हराळ, भाऊसाहेब पवार, बंडू काळे, यांच्यासह देवस्थानचे पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.