★संयमाचा अभाव, जबाबदाऱ्यांचे ओझे अन् कर्जाचा डोंगर !
बीड | सचिन पवार
बदलत्या जीवनशैलीने ताणतणाव, संयमाचा अभाव, जबाबदाऱ्यांचे ओझे आणि कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यात मागील 8 महिन्यांत 440 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात 361 पुरुषांचा समावेश असून हे प्रमाण 82 टक्के इतके आहे. याच काळात 45 महिला (10%), 11 मुली (2.5%) आणि 23 मुलांनी (5.22%) आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाणे महत्त्वाचे बनले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. जगभरात हा दिवस पाळला जातो. या निमित्ताने आत्महत्या करू नयेत, अशा प्रकारची जागृती केली जाते. बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होतात. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. त्यामुळे सततची नापिकी, आर्थिक उत्पन्न कमी असल्याने खासगी सावकारांसह विविध बँका, पतसंस्था यांचे सतत डोक्यावर असलेले कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वृद्ध आई-वडिलांचे आजारपण, इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायम अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतो. आठ महिन्यांत झालेल्या 440 आत्महत्यांपैकी 186 शेतकरी आत्महत्या आहेत. एकूण आत्महत्यांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण 42 टक्के इतके आहे.दरम्यान, महिला आणि युवक, युवतींमध्ये संयमाचा अभाव, अतिराग, हट्टीपणा, जबाबदारी न निभावणे, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मोबाइलचा अतिवापर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही कारणे आहेत. आठ महिन्यांत 45 महिलांसह 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 11 मुली आणि 23 मुलांनी आत्महत्या केली आहे.नैराश्याची काय आहेत लक्षणे सतत दु:खी राहणे, कोणत्याही कामात रस वाटत नाही. ज्या कामातून सर्वात जास्त आनंद मिळतो ते कामही अशा लोकांना करायला आवडत नाही. याशिवाय भूक न लागणे, थकवा जाणवणे, ऊर्जेचा अभाव, झोप न लागणे, अतिविचार, एकाग्रता नसणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण ही देखील नैराश्याची लक्षणे आहेत. असल्याचे तज्ञांच्या मतांमधून समोर आले आहे.
★संयम राखा, वास्तवाचे भान ठेवा
कौटुंबिक जबाबदारी आणि आर्थिक अडचणींमुळे पुरुषांच्या आत्महत्या अधिक होतात. व्यसनाधीनता हेही एक कारण आहे. मात्र, संयम राखून वास्तवाचे भान ठेवले आणि सकारात्मक विचार केला तर नैराश्य येणार नाही. मुले आणि मुली यांच्याबाबत पालकांनी अवास्तव अपेक्षा ठेऊ नयेत, इतरांशी त्यांची तुलना करू नये, मोबाइल, टीव्हीचा वापर कमी करावा, मैदानी खेळांना प्रोत्साहन द्यावे, मुलांशी पालकांचा सुसंवाद असणे आवश्यक आहे.
– डॉ. महोम्मद मुजाहेद
मानसोपचार तज्ज्ञ, बीड.
★टोल फ्री क्रमांकावर फोन करुन या सुविधेचा लाभ
समुपदेशनासाठी 144116 या क्रमांकावर करा फोन करुन संपर्क मानसिक स्वास्थ्य खराब असेल, नैराश्य असेल, उदास वाटत असेल, आत्महत्येचे विचार येत असतील तर अशा नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी शासनाने टेलिमानस सुविधा सुुरू केली आहे. यासाठी नागरिक 144116या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.