[ मी नरेंद्र मोदींच्या नरडीवर बसणार : लालूप्रसाद यादव ]
★जनता ‘इंडिया’ आघाडीला तिरडीवर घेऊन जाईल!
मुंबई : वृत्तांत
राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या एका विधानाने सत्ताधारी भाजप लालबुंद झाली आहे. भाजपने या प्रकरणी थेट विरोधकांच्या इंडिया आघाडीला आता जनताच तिरडीवर घेऊन जाईल, असे म्हटले आहे.
लालूप्रसाद यादव इंडिया बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना मी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नरडीवर बसण्यासाठी आलो असल्याचे म्हटले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या या विधानाप्रकरणी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
★इंडिया आघाडीची बैठक म्हणजे गंमत!
मुनगंटीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक म्हणजे एक गंमत आहे. तिच्याकडे गंमत म्हणूनच पाहा. लालूप्रसाद यादव यांनी मोदींच्या नरडीवर बसण्याची भाषा केली. पण ही मुंबई आहे. येथून 2024 च्या निवडणुकीत हे लोक तिरडीवरच जातील. यावेळी त्यांनी विरोधकांचा मोदी हटाव हा एकच किमान समान कार्यक्रम असल्याचीही टीका केली.शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आव्हान दिले. हो, या प्रकरणी चौकशी होणारच आहे. काल पवारांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसले होते. कदाचित त्यामुळेच पवार तसे म्हणाले असतील, असे वाटते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
★अनेकांना मोह सुटत नाही ; शरद पवारांवर टीका
काल एका नेत्याने भाजपवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आरोप केला. मुंबई तोडण्याची कुणाची हिंमत आहे? हिटलरच्या गोबेल्स नीतीसारखे हे सर्वकाही सुरू आहे. शरद पवारांनी आता आराम करावा, ही त्यांच्याच पक्षातील काही लोकांची इच्छा होती. पण आता अनेकांना मोह सुटत नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
★बच्चू कडू यांच्यावरही निशाणा
मुनगंटीवार यांनी यावेळी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घरापुढे केले आंदोलन चुकीचे आहे, असे ते म्हणाले. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीत काम करणे बंद करावे या मागणीसाठी बच्चू कडू यांनी त्यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केले होते.
★अजित पवारांवर कोणताही अंकुश नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून येणाऱ्या फायली देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मागवल्या आहेत. शिंदेंचा हा निर्णय अजित पवारांना चाप लावणारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी मुनगंटीवार यांना छेडले असता त्यांनी ही चर्चा चुकीची असल्याचे स्पष्ट केले. हे सर्वकाही तिन्ही प्रमुख नेत्यांत समन्वय राखण्यासाठी करण्यात आल्याचे ते म्हणाले.