★वडीलकीच्या नात्याने अजित यांची भेट : शरद पवार
सांगोला | प्रतिनिधी
अजित पवार माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडिलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो तर ही माध्यमांची किंवा वर्तमानपत्रातील चर्चा होऊ शकत नाही. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, भाजपची विचारधारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्थात आमच्या चौकटीत बसत नाही, असे परखड मत शरद पवार यांनी सांगोला येथे मांडले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. अशी भूमिका मांडल्याने शनिवारी अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीच्या चर्चेवर शरद पवारांनी पडदा टाकला.
भाजपसोबत अजिबात जाणार नाही, भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले की, भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.
★I.N.D.I.A ची मुंबईत बैठक
31 ऑगस्टला मुंबईमध्ये प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक आहे. 1 सप्टेंबरला देशातील 40 पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत. त्यावर निर्णय होणार आहे. या बैठकीत काही मुद्दे घेऊन भविष्यातील निर्णय घेतली जाणार आहे. मी स्वतः राष्ट्रवादी म्हणून, उद्धव ठाकरे शिवसेना आणि कॉंग्रेस नेते नाना पटोले आम्ही सर्वांनी मिळून ही बैठक आयोजित केली आहे. या देशातील सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.अजित पवारांसोबत गेलेले लोक दु:खी
शरद पवार म्हणाले की, अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात वापस येऊ इच्छितात. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. चूक सुधारून घ्या, असे सर्वजण म्हणत आहेत. काही उघडपणे असे म्हणत नाहीत. पण त्यांच्यातील दु:ख माझ्यापर्यंत आलेले आहे. 2024 पर्यंत काही बदल होईल, असे वाटते. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
★ती बैठक अजिबात गुप्त नव्हती
काल झालेली अजित आणि माझी बैठक ही अजिबात गुप्त बैठक नव्हती. परंतू माध्यमांनी त्यावर विनाकारण चर्चा केली. याचा अर्थ तुम्हाला काही कामे नाहीत, असे सांगून त्यांनी माध्यम प्रतिनिधींना टोला लगावला. दरम्यान, त्यांच्या या वाक्याने पत्रकारपरिषदेत चांगलाच हास्या पिकला.
★नोटीशींना तोंड देण्यास सक्षम
ईडी नोटीस संदर्भात शरद पवार म्हणाले की, आजची राजकीय परिस्थिती विचित्र झालेली आहे. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सत्ताधारी ईडी, सीबीआय यांच्या नोटीस पाठवत आहेत. परंतू अशा नोटीशींना तोंड देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे पवार म्हणाले.सत्ता काढून घेणे हाच अजेंडा असेल राहुल गांधी पुन्हा खासदार झाले. पंतप्रधान पदासाठी वादविवाद होतील का असा प्रश्न विचारला? तेव्हा शरद पवार म्हणाले की, अजिबात पदासाठी वाद होणार नाही. आज सद्यस्थितीत ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून ते काढून घेणे गरजेचे आहे.