★वनविभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी
बीड | प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पिकावर पेरणी केली. आज कोवळी पिके बोलत आहेत, मात्र याच पिकावर वन्यप्राणी हल्ला चढवत असून पिकाचे नुकसान करत आहेत. कोवळ्या पिकाचे शेंडे हे प्राणी खात असून शेतकऱ्याची मोठी नुकसान होत असल्याने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
खरिपाचा हंगाम सुरू झाला असून एक महिन्याचा कालावधी झाला आहे उशिरा आलेल्या मान्सूनने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे. काही ठिकाणी थोडाफार पाऊस झाला असून याच पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असताना यात वन्य प्राण्यांनी अधिकच भर घातली आहे. रिमझिम येणाऱ्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आणली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मुग अशी पिके खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केली आहेत, मात्र ही पिके उगवली असतानाच हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांनी या पिकावर हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. आपली भूक भागवण्यासाठी हे वन्यप्राणी या पिकावर हल्ला चढवत भूक भागवत आहेत. या कोवळ्या पिकाचा शेंडा खुडल्यानंतर केवळ काड्या शिल्लक राहत असून परत पेरणी व लावणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे वेळ आणि पैसा वाया जात असून आर्थिक नुकसानीलाही सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकरी दिवसभर शेताची राखण करीत आहे अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी हे प्राणी शेतात येतात आणि पिकाचे नुकसान करीत आहेत या तुमचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांपतून होत आहे.
★नुकसान भरपाई द्या!
शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो शेती पिकवतो माल तयार झाल्यानंतर शासन त्याला भाव पण देत नाही. अशा परिस्थितीत वन्यप्राणी ही शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून या प्राण्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा नुकसान भरपाई द्यावी.
शेख कौसर, शेतकरी.