★कुटुंबीय म्हणतात, मुलाने देशासाठी सुवर्णधाव घ्यावी
★अविनाश साबळे च्या यशाबद्दल आष्टीच्या अभिमानात भर ; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव !
आष्टी | प्रतिनिधी
स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत) या प्रकारात 3 हजार मीटर धावून अनेक विक्रम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे हा लांब पल्ल्याच्या धावपटू दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. परिस्थितीने आलेले अनेक अडथळे पार करत सैन्यात सुभेदार झालेल्या अविनाशने आता देशासाठी सुवर्णधाव घ्यावी, अशी भावना निवडीनंतर कुटुंबीयांनी व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्या गावचा मुकुंद साबळे हे रहिवासी. अल्पशा शेतीवर 2 मुले, एक मुलगी आणि पत्नी या कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नसल्याने मुकुंद यांनी 20 वर्षे वीटभट्टी कामगार म्हणून काम केले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. अविनाश साबळे हा मोठा मुलगा. मांडव्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, कड्यात 12 वीपर्यंतचे शिक्षण झालेल्या अविनाशला परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही. लहानपणापासूनच सैन्य दलात भरती व्हायचे स्वप्न असल्याने त्याने तशी तयारी केली. मैदानी चाचणीसाठी तो धावण्याचा सराव करायचा. यात तो सर्व उमेदवारांत पुढे असायचा. 2014 मध्ये तो सैन्यात भरती झाला. सैन्य दलांतर्गत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेत सन 2015 मध्ये त्याने पहिल्यांदा सहभाग घेत स्टीपलचेस या प्रकारात पारितोषिक पटकावले.या मुलात वेगळेपणा असल्याची जाणीव त्याचे प्रशिक्षक अमरीशकुमार यांना झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव सुरू केला अन् त्याच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. 2020 मध्ये झालेल्या टोकियो आॅलिम्पिकसाठी त्याची निवड झाली तेव्हा या प्रकारात 1952 नंतर निवड होणारा तो पहिला भारतीय होता. टोकियोमध्ये तो अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, मात्र त्याने त्याचा सर्वोत्तम वेळ तेव्हा नोंदवला होता.
★परिवाराचे आनंदाश्रू!
सध्या पोलंडच्या सिलेसियामध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगमध्ये त्याने 8:11:63 वेळ नोंदवून सहावे स्थान पटकावले असून तो 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. वडील मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे, भाऊ योगेश यांनी त्याच्या निवडीनंतर आनंद व्यक्त केला आहे.
★गौरव कर्तुत्वाचा!
राष्ट्रकुल पदक, अर्जुन पुरस्कार मिळाला.बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 3 हजार मीटरच्या स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य मिळवणारा अविनाश पहिला खेळाडू आहे. यासाठी त्याला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले, तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननेही त्याचा युवा क्रीडा पुरस्काराने गौरव केला.
★मंगळसूत्र विकले होते..
अविनाशचे वडील मुकुंद म्हणाले, पहिल्यांदा अविनाश सैन्य दलात भरतीसाठी गेला तेव्हा त्याची निवड झाली, पण काही कागदपत्रे कमी पडली. अधिकाऱ्यांनी 3 तासांचा वेळ दिला. बायकोचे मंगळसूत्र मोडून 3 हजार रुपये जमा केले अन् कागदपत्रे मिळवली. पण वेळ निघून गेली व अविनाशची संधी हुकली. नंतर तो 2014 मध्ये भरती झाला. आता तो सैन्यात सुभेदार आहे. देशासाठी त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.