★ ग्रामीण विकास संस्थेतील चाइल्ड हेल्पलाइनमुळे थांबला बालविवाह
★मुलीचे वय निघाले १७ वर्षे ९ महिने, आता दिवाळीनंतर करणार विवाह
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेतील चाइल्ड हेल्पलाइन नंबर १०९८ सकाळी आठ वाजताच खणखणला. मुकुंदवाडीत एक बालविवाह लावला जात असल्याची माहिती त्यावरून देण्यात आली. संस्थेचे कार्यकर्ते उमेश श्रीवास्तव यांनी यांनी तत्काळ मुकुंदवाडी पोलिस आणि दामिनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. लग्नघरी हळदीचा कार्यक्रम सुरू होता, वऱ्हाडी नाचत होते आणि अचानक पोलिसांचे पथक धडकले. त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा समजावून सांगितल्यावर मुलीच्या आईनेच स्वत:हून हे लग्न रद्द करीत दिवाळीनंतर करण्याचे जाहीर केले.मोलमजुरी करणारी एकल आई. परिस्थितीने गांजलेली. मुलीची दहावी झाल्यावर आल्या वराला देण्यास तयार झाली. मुलाचं स्थळही मुंबईला मॉलमध्ये नोकरी करणारा. मंगळवारचा मुहूर्तही ठरला. मात्र, सकाळी आठ वाजताच कुणीतरी चाइल्ड हेल्पलाइनच्या क्रमांकावर बालविवाह होत असल्याची माहिती दिली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे कार्यकर्ते श्रीवास्तव दामिनी पथकाच्या एपीआय सुषमा पवार, हेड कॉन्स्टेबल संगीता परळकर आणि आशा गायकवाड यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि नवरी सजून तयार होती.
★कायदा समजावून सांगितल्यावर पुढे ढकलला विवाह
श्रीवास्तव आणि एपीआय गायकवाड यांनी २००६ सालचा बालविवाहाचा कायदा समजावून सांगितला आणि हे लग्न झालं तर २ वर्षांची शिक्षा आणि १ लाखाचा दंड होईल, असा इशारा दिला. त्याही परिस्थितीत घाबरलेली नवरी आधार कार्ड दाखवत आपल वय पूर्ण असल्याचे दाखवत होती.जन्मतारखेनुसार त्याची पडताळणी केली तर ती १७ वर्षे ९ महिन्यांचीच होती. प्रतिकूल परिस्थितीबद्दल मुलीची आई गयावया करीत होती. मात्र तिचे वय ३४ असल्याने तिचाही बालविवाह झाल्याचे उघड झाले. नवऱ्या मुलानेही फक्त जन्मसाल बघितल्याचे व चूक झाल्याचे कबूल केले. अखेरीस मुलीच्या आईनेच लग्न रद्द करून दिवाळीनंतर करण्याचे जाहीर केले. मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना वय पूर्ण होण्याआधी लग्न केल्यास कारवाईची ताकीद दिली आणि तसा करारही करून घेण्यात आला. मुलीस महिला व बालविकास समितीपुढे हजर करून तिचे काउन्सेलिंग करण्यात आले आणि पुढील तारखेस हजेरीचा आदेश देण्यात आला.