★नर्मदा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी पोहून पकडले
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेणारा शिक्षक नर्मदा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच करमाड पोलिसांनी समयसूचकता राखत नर्मदा नदीत उडी मारून शिक्षक व विद्यार्थिनीला वाचवले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. शिक्षक महेंद्र साठे (वय ४२, ह.मु. करमाड, ता. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, तर अल्पवयीन मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील खासगी संगणक प्रशिक्षण केंद्रात तो शिक्षक होता.
★२३ दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना यश
सायबर सेलचे पोलिस योगेश तलमरे यांच्या तांत्रिक मदतीने पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, दादासाहेब पवार, जयसिंग नागलोत यांच्या पथकाला मिळालेल्या कॉल डिटेल्सवरून बुधवारी हे पथक भोपाळ जिल्ह्यातील नेमवार गावच्या मंदिरासमोर पोहोचले. तेथे पोलिसांना पाहताच आरोपी महेंद्र साठे याने विष घेऊन पाण्यात उडी मारली. त्याच्यापाठोपाठ अल्पवयीन मुलीनेही पाण्यात उडी मारली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला. या वेळी क्षणाचीही उसंत न करता पोलिस नाईक दादासाहेब पवार यांनी नदीत उडी घेतली. पवार हे तिला पकडण्यास गेले असता मुलीने पवार यांच्या गळ्याला मिठी मारली. त्यामुळे पवार हे बुडू लागले. त्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या ताकदीने मुलीला ढकलत सुरक्षित ठिकाणी आणले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलीचे प्राण वाचवणाऱ्या पाेलिस नाईक दादाराव पवार यांचे कौतुक होत आहे.