★बीड तालुक्यात तरुणाची शेतीच्या वादातून आत्महत्या!
बीड | प्रतिनिधी
मोबाइलच्या स्टेटसला श्रद्धांजलीचा फोटो ठेवून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील अंधारापुरी घाटमध्ये रविवारी दुपारी घडली. काकासोबत असलेल्या शेतीच्या वादातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
शुभम बाळासाहेब जगताप (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे मामा शिवाजी घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम जगताप याच्या कुटुंबाचा चुलत्याशी शेतीच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादाला कंटाळून रविवारी दुपारी शुभम याने मोबाइलच्या स्टेटसला स्वत:चा फोटो ठेवला. त्याखाली ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे लिहिले. त्यानंतर त्याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.