★आ.आजबे यांच्या मागणी नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना खुंटेफळ साठवण तलाव या योजनेची स्थगिती उठवण्यात यावी अशी विनंती आपण पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, लगेच त्यांनी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे मागणीचे पत्र दिले आहे ,अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर हा विधानसभा मतदारसंघ कायम दुष्काळी असून पाण्याअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या दुष्काळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजनेला शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून याबाबत वर्तमानपत्रांमध्ये कामाची1359 कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र सध्या या योजनेला स्थगिती देण्यात आलेली असून ती स्थगिती उठवण्यात यावी असे पत्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिनांक 4 जुलै 20 23 रोजी पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की मी आमदार होण्यापूर्वी खुंटेफळ साठवण तलावासाठी शेडगाव -पेडगाव या ठिकाणाहून ही योजना करण्यात येणार होती,त्या ठिकाणाहून ही योजना मतदारसंघाच्या फायद्याची नव्हती
म्हणून आपण आमदार झाल्यानंतर अनेक प्रयत्नानंतर ही जागा बदलून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणाऱ्या शिमपुरा येथून थेट पाईपलाईनद्वारे खुंटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी या योजनेला मंजूरी मिळवली होती परंतु पुढे सरकार बदलल्यानंतर या योजनेला स्थगिती देण्यात आलेली होती ..
त्यामुळे आपण अजित दादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याशी सर्व प्रथम आष्टी तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा केल्यानंतर त्यांना ही आष्टी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थगिती उठवण्याबाबत आपण त्यांना विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपण पक्षीय राजकारण करत नसून कोणत्याही लोकप्रतिनिधीने याबाबत असे राजकारण करू नये ही योजना आष्टी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असलेल्या खुंटेफळ साठवण तलावाचे काम लवकर पूर्ण होण्याची गरज असून शिमपुरा ते खुंटेफळ साठवण तलावामध्ये थेट पाईप लाईन योजनेचे काम एकाच मोठ्या ठेकेदाराकडे देण्यात येऊन त्याचे कडून लवकरच काम पूर्ण करून घेण्याची आवश्यकता आहे या योजनेचे श्रेय केवळ मी एकटा विधानसभा सदस्य या नात्याने घेऊ इच्छित नाही तर यासाठी विद्यमान आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, यांच्यासह अनेकांचे या योजनेचे श्रेय आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.