वेगळं होताना…
गोष्ट सांगतो ऐका…
[ लोकवास्तव : संपादकीय ]
गावातले दिंडीवाले अस्वस्थ होते. भाऊराव मोठा आर्थिक भारही उचलायचे. टेम्पोचा खर्च करायचे. यंदा सगळा खर्च कसा करायचा, ही पण चर्चा चालू होती. अचानक भाऊराव देवळात आले. वारकरी मंडळी जमली होती. भाऊरावनी नेहमीप्रमाणं टेम्पोचे पैसे देऊन टाकले. सगळे त्यांच्याकडं बघत राहिले. भाऊराव म्हणाले, ‘विठ्ठलाला शब्द दिलाय. माझं काम मी केलं. फक्त या वर्षी मी वारीला येणार नाही..’ भाऊराव आणि मीना पालखीसोबत चालत होते… दरवर्षी वारीला जाण्याचा नेम चुकला नव्हता. गेली दहा वर्षे दोघं वारीला जात होती. यंदा गावात कुणालाच वाटलं नव्हतं की दोघं वारीला जातील. कारणही तसंच होतं. गेले चार-पाच महिने नवरा-बायको एकमेकांशी बोलत नव्हते. खूप वर्षे लांबत राहिलेल्या वाटण्या यावर्षी झाल्या. भाऊराव आणि भाऊ गणेश. बहीण नाही. गणेश भाऊरावचा लाडका. त्यात जरा तब्येतीनं नाजूक. भाऊरावांनी त्याला शिकवायचा प्रयत्न केला, पण शिकला नाही.
भाऊराव आणि गणेश दोघे शेतीच करतात. भाऊराव राजकारणात असल्यानं त्यांची पत मोठी. सरपंचही होते. त्यांनी वाटणीच्या वेळी आठ एकरातली पाच एकर शेती गणेशच्या नावावर केली. आणि तिथंच भडका उडाला. मीना संतापली. कधीपर्यंत भावाचे लाड करणार? त्यात भाऊरावला दोन मुली. मीनाच्या डोक्यात त्यांच्या भविष्याचा विचार. शेतीत दर दोन वर्षाला नुकसान ठरलेलं. पुढचं कुणी सांगितलंय? बरं शेती जास्त दिली ती दिली, भाऊरावनी वाडा पण भावाला दिला. त्यांचं कारण सरळ होतं. त्यांनी नवीन घर बांधलं होतं. ते तिथंच राहणार होते. पण, मीनाचा जीव वाड्यात अडकला होता. दोन खोल्या तरी आपल्याकडं ठेवल्या पाहिजे होत्या, असं तिला वाटत होतं. वाटण्या चालू असताना खूप वेळ ती गप्प राहिली. पण, शेवटी न राहवून बोललीच. ‘वाड्यात दोन खोल्या पाहिजेत,’ म्हणाली. भाऊराव संतापले. बायको पहिल्यांदा त्यांच्या विरोधात बोलली होती. ती पण चारचौघात. आजपर्यंत कधी त्यांना मीनाचा एवढा राग आला नव्हता. त्यांनी तिला इशाऱ्यानं गप्प राहायला सांगितलं. पण, ती बोलत राहिली. भाऊराव भडकले. त्यांनी चारचौघात तिला नको ते बोलायला सुरुवात केली. एवढ्या जोरात ओरडले की, मीना तिथंच रडायला लागली. गणेशने मोठ्या भावाला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, भाऊराव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी मीनाला उठून जायला सांगितलं. मीना रडत निघून गेली.
भाऊरावनी जसं ठरवलं होतं, तशीच वाटणी झाली. पण, मीना रागावून थेट माहेरी निघून गेली. सतरा-अठरा वर्षांच्या संसारात पहिल्यांदा नवऱ्याला न विचारता मीना माहेरी गेली. घरचे सगळे हैराण झाले. मीनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ती ऐकायला तयार नव्हती. ज्या घरात फक्त कौतुक ऐकायची सवय होती, त्या घरात शिव्या ऐकाव्या लागल्या. चारचौघात. खूप दुखावली होती बिचारी. तरीही तिला आशा होती की, भाऊराव तिला न्यायला येतील. समजूत घालतील. पण, आठवडा झाला तरी भाऊराव आले नाही. घरच्यांनी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण, भाऊरावही जिद्दीला पेटले होते. त्यांनाही खूप राग आला होता. ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. छोटा भाऊ गणेश समजूत काढत होता. खरं तर त्याला वाटणी नको होती. पण, भाऊरावनी मनानेच ठरवलं होतं. वाटण्या करायच्या. गणेशला कारण माहीत नव्हतं. बिचाऱ्याला वाटलं आपली काही वागण्यात चूक झाली का? त्यानं तसं विचारलही होतं. पण, भाऊरावचं कारण वेगळं होतं. जिल्हा परिषदेच्या कामाला शहरात गेले होते. एका सदस्याच्या कारमध्ये. आणि रात्री कारला अपघात झाला. नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचले. ड्रायव्हर जागीच ठार झाला होता. भाऊरावनी घरी कुणाला सांगितलं नाही. तसा मुका मार होता म्हणून कुणाला लक्षात आलं नाही. पण, ड्रायव्हरच्या गावी दहाव्याला भांडण सुरू झालं. त्याच्या बायका-पोरांना उघड्यावर पडायची वेळ आली. त्यांच्या नावावर काही नव्हतं. भाऊराव अस्वस्थ झाले. गणेशच्या नावावर शेती असली पाहिजे, असं त्यांना वाटू लागलं. जिवाचं काही खरं नाही, असं अचानक त्यांना वाटू लागलं. आणि घाईघाईत वाटणी उरकून घेतली.
मीना माहेरी जाऊन तीन महिने होऊन गेले. आता पावसाळा जवळ आला. शेतीतली कामं अडली होती. पण, भाऊराव अजूनही रागातच होते. त्यांनी मीनाला बोलवणं पाठवलं नाही. स्वतःही गेले नाहीत. पण, वारीचा दिवस जवळ आला तसं त्यांनाही अस्वस्थ वाटू लागलं. गेली दहा वर्षे त्यांनी वारी चुकवली नव्हती. नवरा-बायको सोबत जायचे. गावातले वारकरी एकमेकांत विचारपूस करू लागले. भाऊराव येणार का? पण, कुणी त्यांना विचारायला गेलं नाही. विचारणार कसं? सगळ्यांना दिसत होतं. मीना माहेरी निघून गेलीय. बोलण्यातून कुणाला वाटत नव्हतं की पुन्हा ती परत येईल. घर फुटलं होतं. मुली पण माहेरीच होत्या. खूपदा डोळ्यात पाणी यायचं भाऊरावच्या. पण, मीनाला आणायचा विषय काढला की ओरडायचे. गावातले दिंडीवाले अस्वस्थ होते. भाऊराव मोठा आर्थिक भारही उचलायचे. टेम्पोचा खर्च करायचे. यंदा सगळा खर्च कसा करायचा, ही पण चर्चा चालू होती. अचानक भाऊराव देवळात आले. बाकी वारकरी मंडळी जमली होती. भाऊरावनी नेहमीप्रमाणं टेम्पोचे पैसे देऊन टाकले. सगळे त्यांच्याकडं बघत राहिले. भाऊराव म्हणाले, ‘विठ्ठलाला शब्द दिलाय. माझं काम मी केलं. फक्त या वर्षी मी वारीला येणार नाही..’ सगळ्यांना धक्का बसला. ते भाऊरावला आग्रह करू लागले. ‘तुम्ही आले नाही तर दिंडी जाणार नाही,’ म्हणू लागले. ‘दोघं जोडीनं यायचं..’ बायका म्हणू लागल्या.. ‘सगळं विसरून जायचं. एकदा विठ्ठलाच्या दारी चला दोघं. विठ्ठलाला फैसला करू द्या.. वारीतून परत येताना तुम्हाला दोघाला वाटलं की नाही सोबत राहायचं, तर आम्ही काही म्हणणार नाही. पण, एवढी वारी करा. देवानी जोडी जमवलीय. देवाला ठरवू द्या..’
भोळीभाबडी माणसं. त्यांना सोन्यासारखा संसार मोडताना बघवत नव्हता. देवाच्या नावानं भाऊरावला बोलायची हिंमत करत होते. खूप आग्रह झाल्यावर भाऊरावने मान डोलवली. गणेशने वहिनीला फोन केला. आणायला गेला. वारीच्या दिवशी मीना घरी आली. नवरा-बायको सोबत निघाले. मनात खूप गाऱ्हाणी होती एकमेकांविषयी. पण, टाळ वाजू लागला की विसरून जायचे काही वेळासाठी. अर्थात पहिल्यासारखं बोलणं नव्हतं. ‘हो’ ला ‘हो’ करत होते. भाऊराव पुरुष मंडळीत आणि मीना महिला मंडळीत. असाच प्रवास चालू होता. जेवायला कधी एकत्र बसायचे. या वेळी भाऊरावचे पाय दुखू लागले. सुजले होते. मीना बळजबरीने ते दाबून द्यायची. पण, बोलणं नाही. उलट दुरावा वाढतच चालला होता. सगळे जोडीने फोटो काढत होते. पण, भाऊराव आपल्यासोबत फोटो काढायला जवळ उभे राहत नाहीत, याचा मीनाला जास्त त्रास होत होता.
पंढरी जवळ आली. सोबतचे वारकरी समजून चुकले की, ही जोडी काही पुन्हा जमणार नाही. दोघंही हट्टाला पेटलेले. शेवटी सगळं विठ्ठलाच्या हाती सोपवून वारकरी चालत राहिले. भाऊरावसोबतचे लोक पण तेच करत होते. पंढरीत चंद्रभागेमध्ये स्नान करून दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. सगळ्यांना विठ्ठलाला भेटायची ओढ लागली होती. दशमीला मध्यरात्रीच्या सुमारास भाऊराव, मीना अन् गावकरी देवळाच्या दारी पोहोचले नि दर्शन रांग एकदम थांबली. मग अचानक जाहीर झालं की, मुख्यमंत्र्यांसोबतची पूजा करण्याचा मान भाऊराव आणि मीनाला मिळणार! हे ऐकून गावातल्या वारकऱ्यांना आनंदानं वेड लागायचं बाकी राहिलं. भाऊराव आणि मीना विठ्ठल-रुखमाईपुढं उभे राहिले आणि एकएकी लहान मुलासारखं रडू लागले. मुख्यमंत्री गोंधळून गेले. कमरेवर हात ठेवलेल्या विठुरायानं मिटल्या डोळ्यातूनही आपल्याकडं बघितल्यासारखं वाटून भाऊराव अन् मीना सगळं भांडण विसरून गेले. दुसऱ्या दिवशी दोघांचा फोटो पेपरच्या पहिल्या पानावर छापून आला. भाऊराव म्हणाले, ‘आपल्या मनात वेगळं व्हायचं होतं. पण, विठ्ठलाच्या मनात वेगळंच होतं..’