ना.धनंजय मुंडे होणार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री!
* आमदार क्षीरसागर थोरल्या पवारांसोबत ; तर दोघांचे वेट अँड वॉच!
बीड | प्रतिनिधी
राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर जिल्ह्यातील समीकरणे बदलणार राज्यातील राजकारणात रविवारी दुपारी झालेल्या घडामोडीत अजित पवार यांचे समर्थक असलेले परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये शपथ घेतली. ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील हे निश्चित आहे. धनंजय मुंडे हे शनिवारी परळीत होते, मात्र रात्रीतून ते मुंबईत पोहोचले.दुसरीकडे माजलगावचे आ. प्रकाश सोळंके, आष्टीचे आ. बाळासाहेब आजबे आणि बीडचे आ. संदीप क्षीरसागर हे रविवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले. यातील आ. संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडियावरून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची माहिती दिलीस तर आ.सोळंके व आजबे यांनी मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती.राज्यातील सत्तासंघर्षात रविवारी दुपारी अचानक मोठ्या घडामोडी घडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे अनेक आमदारांसह थेट सत्तेत सहभागी झाले व त्यांनी थेट उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातून अजित पवार यांच्यासोबत कोण जाणार याकडे लक्ष आहे. जिल्ह्यात आष्टी, माजलगाव, बीड आणि परळी या चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
* मुंबईत पोहोचून माझी भूमिका मांडेल
छत्रपती संभाजीनगरमध्ये मशिप्रची निवडणूक असल्याने मी तिकडे व्यग्र होतो. निवडणूक होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर मी दुपारी मुंबईकडे निघालो. मुंबईत पोहोचून माझी भूमिका मांडेल.
– आ. प्रकाश सोळंके
आमदार माजलगाव.
* सदैव साहेबांसोबत, क्षीरसागरांची पोस्ट
आ. संदीप क्षीरसागर हे दुपारी मुंबईकडे रवाना झाल्यावर अनेक कार्यकर्ते, पत्रकार त्यांना आपण कुणासोबत? हे विचारण्यासाठी संपर्क करत होते. मात्र त्यांचा फोन बंद होता. सायंकाळी क्षीरसागर यांनी ‘सदैव साहेबांसोबत’ अशी फेसबुक पोस्ट करून आपली भुमिका स्पष्ट केली.दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे. अद्याप कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपली भूमिका मांडलेली नाही. जे घडले ते अचानक घडले आहे त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
*जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांकडे लागले लक्ष!
पवार यांचे विश्वासू धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी पहाटेच्या शपथविधी वेळीही मुंडे यांचे नाव चर्चेत होते. उर्वरित आमदारांपैकी संदीप क्षीरसागरयांनी आपण शरद पवार यांच्यापासून दूर जाणार नाही हे स्पष्ट केले आहे, तर आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे व माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मात्र भूमिका स्पष्ट केलेली नाही.
*इतर पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष!
मुंडे रात्रीतून मुंबईला, बाकीचे रविवारी दुपारी अजित पवार यांनी जिल्ह्यातील आमदारांना शनिवारी रात्री फोन करून मुंबईत येण्यास सांगितले हाेते. यानंतर परळीत असलेले धनंजय मुंडे हे रात्रीतून मुंबईला रवाना झाले होते. बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागरही रविवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले.