धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच ठाकरे गट आक्रमक!
★ नगरपालिकेची श्वेतपत्रिका जाहिर करण्याची मागणी
बीड | प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेताच शिवसेनेचा ठाकरे गट परळीत आक्रमक झाला आहे. पालिकेत सरत्या पंचवार्षिकमध्ये सभापती पदाचा कारभार केलेल्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगरपालिकेची श्वेतपत्रिका जाहिर करण्याची मागणी करत भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.मागील पंचवार्षिकमध्ये परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती.राज्यात महा विकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका गंगा सागर शिंदे यांनी शेवटच्या वर्षात महिला व बालकल्याण सभापतिपद भुषविले. शिंदे यांचे पुत्र व्यंकटेश शिंदे हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख असुन सध्या ते ठाकरे गटात आहेत.सत्ता भोगताना परळी पालिकेत होणार्या भ्रष्टाचाराबाबत अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरे गटाने धनंजय मुंडे यांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेताच आक्रमक होत तीर्थक्षेत्र विकास योजनेतील भक्त निवासाचे काम कालावधी उलटला तरीही पूर्ण का झाले नाही.डॉ भालचंद्र वाचनालय इमारतीचे काम पूर्ण झाले असून अद्यापर्यंत तिचे हस्तांतरण का झाले नाही असा प्रश्न उपस्थित करुन नगरोत्थान, वैशिष्टपूर्ण,भुयारी गटार,यासह विविध योजनेत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
★भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार
परळी नगर परिषद भ्रष्टाचाराचे माहेरघर बनली आहे. शेकडो कोटीच्या योजनेतून परळी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या संकल्पनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. विविध योजनांतून करण्यात आलेल्या बोगस कामाची बिले टक्केवारी घेऊन काढली जात आहेत. विविध योजनेच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेल्या निधी चे लेखा परिक्षका मार्फत परीक्षण करून जनतेसमोर श्वेत पत्रिका जाहीर करा. त्याच बरोबर वर्षांनुवर्षे परळीत ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करत परळी पालिकेतील भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार असल्याचे व्यंकटेश शिंदे यांनी सांगितले.