देवेंद्र फडणवीस यांना वाचाळवीरांना ताकद देऊन काय साध्य करायचंय ?
महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या वाचाळवीरांना भाजपचा आधार का ?
★अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
★महायुतीच्या सभेतून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन टीका केल्यामुळे नव्या वाद निर्माण
★महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या नेत्यांना कुणाचं अभय!
मुंबई | वृत्तांत
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महिविकास आघाडीतील नेते एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करताना दिसत आहेत. पण, आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले. सदाभाऊंनी पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन टीका केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार केला आहे.
सांगलीत्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी आपल्या भाषणात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावर टीका केली. विशेष म्हणजे, मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. “ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.
★जितेंद्र आव्हाडांचा सदाभाऊंवर हल्लाबोल
सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोतांवर निशाणा साधला. “सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचे ऑपरेशन झाले, त्यांच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का? महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांना बोलणे यावरुन तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणे मुश्किल होईल”, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
★सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील…देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागलेत माहितीय का? गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं असतात. यामधील अर्धथानं वासराला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. पण, देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, गायीचं सगळं दूध वासरांचं(राज्यातील जनतेचं) आहे, मी सगळं दूध वासरांनाच देणार..मग पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्यापिल्यांचं कसं व्हायचं..?””पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या…पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?” अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली.
★सदा सारखे असंख्य वाचाळवीर त्यांना अभय कोणाचं ?
सदा खोत यांच्यासारखे असंख्य वाचाळवीर महाराष्ट्रामध्ये मोकाट फिरतात त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन स्टेजवर भाषण करायला लावून मोठे नेते माग दात काढतात मग त्यांच्याकडूनच या वाचाळवीरांना फुस आहे का ? जर नसेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? पण जर फुस असेल तर अशा पक्षांना जनतेने का निवडून द्यायचं ? अशी अनेक प्रश्न सध्या जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत… येणाऱ्या 20 तारखेला जनता याचे उत्तर देतील आणि 23 तारखेला ते उत्तर अधिकृत कळेल यात शंका उरली नाही.