★मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार
मुंबई :वृत्तांत
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे दिवाळीत प्रचार थंडावला आहे. दिवाळी ३ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. ही मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहे. प्रचार कालावधीत सुटीचा रविवार हा महत्त्वाचा असतो. या कालावधीत केवळ १० नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला रविवार आला आहे. रविवार प्रचाराचा वार ठरतो.विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, तर महाविकास आघाडीकडून प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रचारासाठी येतील.
★उमेदवारांचा कस
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. या कालावधीत विधानसभा मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कस लागणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. प्रचार रॅली आणि नेत्यांच्या जाहीर सभा कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक करावे लागणार आहे.
★अटीशर्तीचे बंधन
सर्वपक्षीय उमेदवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आदर्श अचारसंहिता लागू असून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर प्रचार करताना आयोगाने घातलेल्या अटी, शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे.