★प्रथमच आष्टी विधानसभेत पक्ष सोडून अपक्ष लढण्यावर भर
पाटोदा | प्रतिनिधी
भाजप राष्ट्रवादी शिवसेना यांची महायुती निर्माण झाल्याने आमदारकीचे दावेदार असणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. तीन पैकी एका पक्षाला तिकीट मिळणार असल्याने इतर दोन पक्षातील दावेदार मात्र अपक्ष लढण्यावर भर देत आहे. मग असं केलं तर या युतीचा फायदा काय ? मग युती करायची कशासाठी ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण युतीमुळे आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळत आहे. विशेष करून आष्टी मतदार संघात भाजपकडून सुरेश धस भीमराव धोंडे हे इच्छुक असून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचा आमदारकीच्या तिकिटावर दावा असल्याने धस-धोंडे यांची चांगलीच गोची झाली आहे.
आष्टी मतदार संघाचे तिकीट जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना निश्चित झाल्याचे समजताच भीमराव धोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरला तर सुरेश धस यांनी सुद्धा अपक्ष लढण्यावर भर दिला आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात कोणत्याच पक्षाला तिकीट नको आम्हा तिघालाही अपक्ष लढण्याची मुभा द्यावी अशी विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचं आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले. कोणत्याच पक्षाचे कुणालाच तिकीट नको स्वतःची ताकद किती हे दाखवण्यासाठी आम्हाला तिघालाही अपक्ष लढू द्या असे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब आजबे यांना तिकीट जाहीर असल्याचं त्यांच्या एकंदरीत भाषणातून समोर येत आहे.
★महायुतीकडून आमदार बाळासाहेब आजबेच जाहीर असल्याचे संकेत!
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे शुभ संकेत मिळत आहे. तरीदेखील भाजपकडून धस आणि धोंडे हे उमेदवारी मिळण्यासाठी चांगलीच रस्सीखेच करताना दिसत आहेत. महायुतीकडून ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम इतर दोघांना करावंच लागेल अन्यथा युतीमध्ये बिघाडी सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा संकेत मिळत आहेत.
★सुरेश धस यांच्याकडून अपक्ष लढण्याचं आव्हान!
महायुतीने जरी एक उमेदवार जाहीर केला असला तरी इतर दोघांचं काय होणार ? मग त्यांनी केलेल्या कामाचं काय ? असे प्रश्न उपस्थित होण्यापेक्षा महायुतीच्या तीनही इच्छुक उमेदवारांनी अपक्ष लढून स्वतःची ताकद दाखवावी आणि निवडून यावे असे जाहीर आव्हान आमदार सुरेश धस यांनी केल्याने 30 तारखेला काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.