भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
बीड | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांना पक्षाला रामराम केला आहे. राजेंद्र मस्के हे भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत.त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राजेंद्र मस्के यांनी पक्षाचा त्याग करत असल्याचं म्हटलंय.
राजेंद्र मस्के यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यासह भारतीय जनता पक्षाचा त्याग करत आहे. राजेंद्र मस्के यांच्या या निर्णयामुळे बीडमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांची बीड विधानसभेची भूमिका जाहीर केली होती.गेल्या महिन्यात राजेंद्र मस्के यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत आमचा गाडा उतरणार, फक्त कोणते बैल या बैलगाड्याला लावायचे हे ठरणं बाकी असल्याचं म्हटलं होतं. खुद्द पंकजा मुंडे यांनीच राजेंद्र मस्के बीड विधानसभा लढणार असं आधीच जाहीर केलं होतं. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मस्के यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
★मस्के यांच्या बैलगाडा शर्यती पोस्टरची झाली होती जोरदार चर्चा!
बीडमध्ये बैलगाडा शर्यतीवेळी राजेंद्र मस्के यांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा झाली होती. राजेंद्र मस्के यांनी एका पोस्टरवर जरांगेंचा तर दुसऱ्या पोस्टरवर पंकजा मुंडेंसोबत फोटो लावले होते. तसंच मनोज जरांगे यांची भेटही घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांची भूमिका होती.