आष्टी मतदारसंघात महायुतीकडून दिग्गज नेत्यात रस्सीखेच!
आष्टी | प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवार आपापल्या परीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. राजकिय वर्तुळात दररोज नवनवीन अंदाज बांधले जात आहे. अशाच प्रकारचे अंदाज आष्टी विधानसभा मतदार संघात देखील बांधले जात आहेत. परंतु काही राजकिय अभ्यासकांकडून आष्टी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आ. बाळासाहेब आजबे असणार आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार असणार आहे. या दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच वर्षांत अनेक राजकिय घडामोडी घडल्या आहे. दोन मोठ्या पक्षांमध्ये फुट पडून मोठे गट पक्षातून बाहेर पडले. या गटाने मुळ पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील आपल्याकडे खेचून आणले. त्यामुळे मुळ पक्षांना दुसरे निवडणूक चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते आता तेच चिन्ह घेऊन विधान सभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या पक्ष फुटीनंतर राज्यातील सर्व राजकिय समीकरण बसलेले असुन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची या वरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. आष्टी विधानसभा मतदार संघात माञ विद्यमान आ. बाळासाहेब आजबे यांना महायुतीची उमेदवारी निश्चित मानली जात असुन समोरून त्यांना तुतारीचे आव्हान मिळणार असल्याचे अंदाज राजकिय गोटातून येत आहे. माजी आमदारांपैकी एक जण तुतारी कडून उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणते माजी आमदार तुतारी घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे लवकरच निश्चित होईल.
★माजी राज्यामंञी धसांच्या बॅनर वरून भाजपाचे नेते गायब
भाजपाचे नेते माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी मतदार संघातील व्यापाऱ्यांचा मेळाव घेतला. त्या मेळाव्याच्या ठिकाणी व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर भाजपाच्या एकाही नेत्याचा फोटो लावण्यात आला नव्हता. त्याच बरोबर धस यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट यावरून धस हे येणारी विधान सभा निवडणूक अपक्ष लढणार कि तुतारी घेऊन लढवणार या बाबत मतदार संघात तर्कवितर्क लावले जात आहेत.
★महायुतीची उमेदवारी मिळण्याचा आजबेंना विश्वास
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कडून आपल्याच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगत आहेत. आ. बाळासाहेब आजबे हे उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित करून निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचे दिसत आहे.
★धोंडेकडून तुतारीच्या उमेदवारीच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम!
मा. आ. भीमराव धोंडे यांना शदर पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळणार असल्याच्या बातम्या समाज माध्यमातुन तसेच काही प्रसार माध्यमातून बातम्या येत होत्या त्यामुळे मतदार संघात या विषयी जोरदार चर्चा सुरू होती. या बाबत मा. आ. भीमराव धोंडे यांनी समाज माध्यमातून खुलासा करत तुतारीकडून मी उमेदवार नसल्याचे स्पष्ट करून या चर्चला तूर्तास तरी विराम दिला असुन भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असेही त्यांनी खुलाशात म्हटले आहे. त्यामुळे धोंडे ऐनवेळी पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ शकतात अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.