★पूजाताई मोरेंचां पहिल्या टप्प्यात दीडशे गावांचा संवाद दौरा पूर्ण!
गेवराई | प्रतिनिधी
गेवराई विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे यांनी प्रमुख दावेदारी केली आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास दीडशे गावात आपला पहिल्या टप्प्याचा संवाद दौरा पूर्ण केला आहे. काल त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी पवारांनी पुजा मोरे यांना आशीर्वाद देत लढण्यासाठी नवी ऊर्जा दिली आहे. या भेटीचा फोटो पुजाताई मोरे यांनी आपल्या फेसबूवर पोस्ट केला आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघात प्रत्येकवेळी पवार-पंडित घराण्यात लढत होते. पण ही लढाई नेहमीच लुटूपुटूची असते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला गेवराईत शेतकरी चळवळीत काम करणार्या पुजाताई मोरे यांनी साथ दिली. पवारांनी देखील पुजाताईंवर विश्वास टाकत त्यांच्यावर पक्षाच्या किसान सेलची राज्यस्तरीय जबाबदारी दिली. त्यामुळे तरुणांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अल्पावधीतच ही ताकद दिल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत पुजाताई मोरे यांनी खा. बजरंग सोनवणे यांच्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. याची दखल पक्ष नेतृत्वाकडून देखील घेण्यात आली आहे. पक्षाने प्रत्येक मतदारसंघात सर्वे सुरू केले आहेत. त्यात पुजाताई मोरे यांचे देखील नाव आहे. त्यामुळे तुतारीच्या चिन्हावर उभे राहण्यासाठी पक्षाकडून पुजाताई मोरे यांना बळ दिले जात आहे. तरुण चेहरा, शेतकरी चळवळीतील चेहरा व विस्थापितातून नेतृत्व घडवण्याची शैली शरद पवार साहेबांकडे असल्याने निलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे यांच्याप्रमाणे गेवराईतील घराणेशाहीच्या राजकारणाला फाटा देत पूजाताई मोरे यांच्या सारख्या चेहर्याला उमेदवारी दिल्यास नवल वाटायला नको, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते आहे.