मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची ई-केवायसी करण्यासाठी पैसे देऊ नये – नाजीम शेख
आष्टी | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी जवळील गॅस एजन्सी कार्यालयात जाऊन ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई- केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर देऊ नये असे आवाहन नगरसेवक नाजीम शेख यांनी केले आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांची घोषणा करून त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. विशेषतः महिलांसाठी जास्तीच्या योजना राबवण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासह इतर योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा राज्यातील 52 लाख 16 हजार 412 कुटुंबाला लाभ मिळणार आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणाऱ्या योजनेसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी पैश्याची मागणी करत असेल त्याची तक्रार करावी व त्याला पैसे देऊ नये असे आवाहन अजित पवार गटाचे नगरसेवक नाजीम शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.