★वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे तहसीलदाराचे आवाहन
आष्टी | प्रतिनिधी
मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. कडा येथे रहदारीसाठी केलेला पर्यायी पूल सोमवारी रात्री झालेल्या पावसाने वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. यामुळे वाहनधारकांनी येण्याजाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित विभागाकडून संथगतीने काम सुरू असल्याने अनेक अडचणीचा सामना प्रवाशी, वाहनधारकांना करावा लागत आहे. रस्ता काम करताना कडा येथील मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील स्मशानभूमीजवळ मातीचा भराव व त्याखाली नळकांड्या टाकून पूल करण्यात आला होता. सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने कडीनदीला पाणी आल्याने हा पर्यायी पूल रात्री उशिरा वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. तर आष्टीवरून कड्याला आणि नगरवरून कड्यामार्ग येणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.