9.7 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्ह्यातील महायुती व महाविकास आघाडीमुळे मतदार संघाची अदलाबदल होणार

★अनेक विद्यमान उमेदवारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

बीड | प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अधिक प्रभावीपणे पुढे आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाविकास आघाडीचा उत्साह वाढलेला आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचे समीकरण बदलले आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे बदल पहावयास मिळणार आहेत. मतदार संघाचीसुद्धा अदलाबदल केली जाणार आहे. महायुतीमध्ये भाजपाला जे पोषक मतदार संघ आहेत. ते भाजपला सोडले जातील तर अजितदादा पवार गटाला जे पोषक आहेत. ते राष्ट्रवादीला सोडले जाणार आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जर महाविकास आघाडीला यश मिळाले नसते तर महाविकास आघाडी बर्हिवक्र भिंगाने शोधावी लागली असती. परंतु एका निवडणुकीने सारा चमत्कार घडवून आणला आहे. महायुतीला महाराष्ट्रात अपयश आले असून आता महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात पहिला प्रश्न असा की, जागा कोणाला किती सुटणार? दुसरा प्रश्न मिळालेल्या जागांवर महायुतीतील घटक पक्ष समाधानी होणार का? तिसरा प्रश्न कोणती जागा कोणाला? यावर एकमत होणार का? चौथा प्रश्न एकमत झाले तर त्या ठिकाणी होणारी बंडखोरी थोपविली जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर उभे ठाकणार आहेत. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे जागा वाटप कसे असणार? किंवा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना कोणत्या जागा सुटणार याची उत्सुकता लागलेली आहे. येणार्‍या काही दिवसांमध्ये या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जागा वाटपाच्या व इतर निश्चितीच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी सध्या चार विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. त्यापैकी तीन मतदार संघावर अजित पवार गटाचा प्रभाव आहे. तर बीड विधानसभा मतदार संघावर शरद पवार गटाचा प्रभाव आहे. भाजपाचा प्रभाव हा केज आणि गेवराई मतदार संघावर आहे. हाच विजयासाठीचा फॉर्म्युला विधानसभेला राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एका एका मतदार संघाचा आढावा घेतला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्याचे उत्तर पक्षश्रेष्ठीकडे नाही. परळी विधानसभा मतदार संघ हा भाजपा लढवणार नाही. कारण त्या ठिकाणांहून पंकजाताई मुंडे या विधानपरिषदेवर जात आहेत. तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीने ही जागा जिंकलेली असल्याने त्या ठिकाणी ना. धनंजय मुंडे हे एकमेव महायुतीचे उमेदवार असतील. माजलगाव मतदार संघात विद्यमान आमदार अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आहेत. त्या ठिकाणी भाजपाकडून रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, बाबरी मुंडे, केशवराव आंधळे, बाबुराव पोटभरे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. यापैकी आडसकर आणि मोहनराव जगताप हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेणार की आ. सोळंके यांचा प्रचार करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. लक्ष्मण पवार हे भाजपाचे आहेत. त्यांच्या मतदार संघातून 39 हजार मतांची आघाडी राष्ट्रवादीला मिळालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आ. पवार यांनाच ती जागा सुटणार की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी आ. अमरसिंह पंडित यांना ती जागा सुटणार अशी चर्चा आहे. त्या ठिकाणी जागा अदलाबदलीच्या फॉर्म्युल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
आष्टी-पाटोदा विधानसभा मतदार संघ हा सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. त्या ठिकाणी त्यांच्याकडेच राहिल का? असा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणांहून आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत. आष्टीने लोकसभेला जेमतेम आघाडी देण्याचा प्रयत्न केला आहे. ही जागा भाजपाला सुटणार अशी चर्चा आहे. कारण आष्टीची जागा भाजपाला तर गेवराईची जागा राष्ट्रवादीला सुटणार ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या ठिकाणी आ. सुरेश धस किंवा त्यांचे पुत्र जयदत्त धस यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. त्या ठिकाणी आ. बाळासाहेब आजबे व धोंडे यांची भूमिका कशी असेल हे येणार्‍या काळात दिसणार आहे.
बीड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहेत. त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट इच्छुक आहे. कारण आजवर शिवसेनेने ती जागा लढवलेली आहे आणि सुटलेली आहे. यंदा उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवार नाहीत. परंतु शिवसेना शिंदे गटाकडून अनिल जगताप हे इच्छुक आहेत. तसेच भाजपकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे सुद्धा इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटते? याकडे लक्ष असणार आहे.
केज विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. नमिता मुंदडा या भाजपच्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून व शिवसेना शिंदे गटाकडून कोणी इच्छुक आज तरी नाही. परंतु महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला सुटणार असल्याने माजी आ. पृथ्वीराज साठे यांचा दावा प्रबळ असणार आहे. तसेच सौ. मनिषा गोकुळ जाधव या सुद्धा शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्या सोबतच माजी आ. प्रा. संगिताताई ठोंबरे, डॉ. सौ. अंजलीताई घाडगे, डॉ. नयना सिरसाट या इच्छुक उमेदवार आहेत. या ठिकाणची लढत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होणार आहे. हे जरी आजचे चित्र असले तरी येणार्‍या काळामध्ये बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहेत. भाजपाला किती जागा सुटणार, राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागा लढणार? लढवणार्‍या जागांवर ते समाधानी राहतील का? किंवा स्वतंत्ररित्या सर्वच पक्ष निवडणुका लढवतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर जिल्ह्यात केवळ शरद पवार गटाचा एकमेव आमदार बीडमध्ये आहे. इतर ठिकाणी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचा आमदार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील समिकरण कशा पद्धतीचे असेल. असे महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष कोणत्या जागा मागतील? कोणत्या जागांवर समाधान होईल. असे अनेक तर्क आजपासून लावले जात आहेत. बीड जिल्ह्यातील विधानसभेची निवडणूक रंजक होणार आहे. अनेक मतदार संघाची अदलाबदल होणार आहे, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे. उमेदवारांची पळवापळव होणार आहे. अनेकजणांचे पक्ष प्रवेश होणार आहेत. त्यामुळे येणारे दोन महिने जिल्हावासियांना मनोरंजनाचे जाणार एवढे मात्र खरे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!