★सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी इथं ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होत असल्याचे निदर्शनास आले
बीड | प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी इथं ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होत असल्याचे निदर्शनास आलं आहे. काही दिवसांत दुसऱ्यांदा ड्रोनद्वारे अंतरवाली सराटी येथे टेहळणी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नेमक्या कोणत्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुक्कामी असलेल्या सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घरावरती ड्रोन उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून तीन दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार घडल्याचे नागरिक सांगत आहे. मागील आठवड्यात जायकवाडी धरणावर देखील अशाच प्रकारे प्रकारची टेहळणी झाल्याचं समोर आलं होतं. हे ड्रोन कोण फिरवतो, यावर अनेक प्रकारच्या चर्चेला उधाण आलं असून याबाबत कोणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.दरम्यान, ड्रोनद्वारे होत असलेल्या या टेहळणीबाबत लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही समजते.