★ भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला
मुंबई : वृत्तांत
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. जागा वाटपावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या प्राथमिक चर्चा होताना दिसत आहे. याचबरोबर त्यांनी महायुतीच्या विधानसभेसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.
संतांच्या पालख्या आज पुण्यनगरीत होत्या. संतांच्या दर्शनासाठी आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आषाढी एकादशीची पुढची पूजा करणार, अशी गुगली टाकून त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रकांतदादांनी त्यावर उत्तर देताना मोठा दावा केला आहे.आगामी आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पांडुरंगाची महापुजा करतील, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराच्या गुगलीवर षटकार ठोकत आपल्यातील कसलेल्या राजकारण्याचे दर्शन घडविले. पुण्यात माध्यमांशी बोलताना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादांनी सेफ उत्तर देत कोणत्याही वादात न अडकण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जी त्रिमूर्ती आहेत. ते जागा वाटपासारख्या चर्चा वेळेवर करण्यासाठी अगदी सक्षम आहेत. इतरांसारखे प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदा घेऊन बातम्या लिक करणे, असे काही करणार नाहीत.
★ताकदीप्रमाणे जागा मिळणार
महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील जागांचे वाटप लवकर होईल. जेणेकरून प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवारांची निश्चिती लवकर करता येईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.पुढच्या आषाढी एकादशीला पूजा कोण करणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिले. पुढच्या आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतील, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.