★१० दिवसांत तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल ; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
मुंबई : वृत्तांत
मनोज जरांगे यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. त्यांच्या मागण्यांचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपापल्या मागण्यांवर लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे.
मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला न्याय मिळेल. प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो. आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करत आहोत. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोनदा सांगितले आहे. देशभरात अनेक मतदारसंघात मुस्लिमांचा विरोधात मतदान झाले आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे काही बोलायचे आहे, ते बोलत असतो, असे सत्तार यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत…
मनोज जरांगे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या १० दिवसांत या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे मोठे विधान सत्तार यांनी केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, एक रुपयात पिक विमा देण्यात येत आहे. असे असताना कोणी ज्यादा पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हवा आहे, असे सत्तार यांनी सांगितले.