★मुलीच्या जन्माचा पाटोद्यात रंगला स्वागत सोहळा
पाटोदा | प्रतिनिधी
नात झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आजोबांनी नातीचा जन्मोत्सव साजरा केला. एकीकडे मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा अशी मानसिकता असताना, दुसरीकडे अशाप्रकारे सकात्मक आणि आदर्श पावलंही उचलली जात आहेत.
पाटोदा शहरात एक अनोखा स्वागत सोहळा साजरा झाला. एक चिमुकली पाहुणी घरी येणार होती. तिच्या स्वागताला जाधव कुटुंब जणू आसुसलेलं होतं. सकाळपासून या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहत होते. ही पाहुणी दुसरी-तिसरी कुणी नसून दोन दिवसांपूर्वी जन्मलेली जाधव कुटुंबाची नात होती. आपल्या तान्हुल्या नातीच्या स्वागतासाठी तिच्या आजोबांनी मोठा समारंभ आयोजित केला होता.
पाटोदा तालुक्यातील कुसळंब (हल्ली मुक्काम नाशिक) येथील शिवानी आबासाहेब पवार यांच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं.दि.३जुन रोजी बीड येथील खाजगी रुग्णालयात या मुलीने जन्म घेतला. मुलगी जन्माला आल्याचा आनंद या दाम्पत्य व आजोबा दिलिप जाधव यांच्या व कुटुंबीयांच्या गगनात मावत नव्हता. दवाखान्यातून घरी आणताना स्वागत समारंभ करण्याची योजना आजोबा दिलीप जाधव यांनी आखली. त्यांच्या कुटुंबीयांनी सुध्दा आनंदात हिरहिरीने भाग घेत फटाक्यांची आतिषबाजी रांगोळी,फुलांच्या पायघड्या घराची सजावट आदीं करण्यात आले.
★फटाक्यांची आतषबाजी,औक्षण!
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लाडक्या लेकीचं आगमन झालं. फटाक्यांची आतषबाजी,औक्षण करुन या नव्या जीवाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. केवळ कुटुंबीय नाही तर नातलग, शेजारी या आनंद सोहळ्याचा भाग बनले होते.
★मुलीच्या जन्माच स्वागत
नवजात मुलीच्या आई-वडिलांना झालेला आनंद अवर्णनीय झाल्याचे दिसून आले.मुलीच्या जन्माचा स्वागत हा बदल समाजमनाला नवी दिशा देणारा आहे.पाटोदा शहरातील हा स्वागत सोहळा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असा आहे. तसं झालं तर लेक वाचवा अभियानाला खऱ्या अर्थाने गती येईल.