लोकनीती-सीएसडीएसचच्या विश्लेषकांची भविष्यवाणी ; महायुतीला धक्का!
★ आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची सर्वांना उत्सुकता
मुंबई : वृत्तांत
महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान संपले असून आता ४ जूनच्या निकालाची सर्व प्रतिक्षा करत आहेत. राज्यात ४८ जागांसाठी मतदान पार पडलं. याठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. मात्र राज्यात निकालाआधीच अनेक उमेदवारांनी जिंकण्याचे दावे केले आहेत. काही उमेदवारांच्या विजयाचे पोस्टर्सही झळकल्याचं समोर आलं आहे.
त्यातच लोकनीती-सीएसडीएसचे प्रोफेसर आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी जी भविष्यवाणी केली आहे. त्याने अनेकांची झोप उडाली आहे. न्यूज तकशी बोलताना प्रोफेसर संजय कुमार यांनी महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची भविष्यवाणी केली आहे. हा निकाल हैराण करणारा आहे. संजय कुमार यांच्या भविष्यवाणीनुसार राज्यातील भाजपाला मोठा धक्का बसत आहे. कारण याठिकाणी भाजपाचं मिशन ४५ अपयशी ठरणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
★काय आहे भविष्यवाणी?
महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला जास्त यश मिळेल. तर जागांच्या बाबतीत भाजपाची कामगिरी निराशाजनक असेल. काँग्रेसला यंदा प्रादेशिक पक्षांचे समर्थन अधिक मिळालं. महाविकास आघाडी राज्यात २५-२६ जागा जिंकण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकूण २१ ते २२ जागा मिळू शकतात. मागील लोकसभा निवडणुकीत NDA नं महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी एनडीएला फटका बसताना दिसत आहे.
★कुणी किती जागा लढल्या?
महायुतीचं बोलायचं झालं तर भाजपानं २८ जागांवर निवडणूक लढली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने १५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४ जागांवर उमेदवार उभे केले होते. महायुतीनं राष्ट्रीय समाज पक्षाला १ जागा दिली होती. तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक २१ जागा लढवल्या. त्यानंतर काँग्रेसनं १७ जागांवर निवडणूक लढवली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर निवडणूक लढवली आहे.
★पक्षफोडीमुळे भाजपाला नुकसान?
२०१९ ला राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता काबीज केली. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात फूट पडली. शिंदेसोबत पक्षातील ४० आमदार, १२ खासदार बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना सोपवली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरले. तर २०२२ मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत फूट पडली. तिथेही घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवारांना मिळालं. त्यामुळे राज्यातील २ मोठ्या प्रादेशिक पक्षात फूट पडल्यानं स्थानिक जनतेमध्ये रोष असल्याचं दिसून आलं होते. त्यामुळे या पक्षफोडीमुळे भाजपाचं नुकसान होणार असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.