★18 वर्षांनंतर भेटले मित्र- मैत्रिणी
विहामांडवा | इम्तीयाज शेख
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते विहामांडवा येथील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. 2004-05 व 2007-08 जवळपास 18 वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा दि.26 मे रविवार रोजी विहामांडवा येथील तांबे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील जिल्हा परिषद प्रशाला व ज्ञानदिप विद्या मंदिर या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक डमाळ सर हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.त्यांनतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.जिल्हा परिषद व ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थी व त्यांच्या सहकारी यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी विहामांडवाच्या बाहेर असून ते या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक डमाळ सर,लोमटे सर,नवपुते सर,मोमिन मॅडम,शेळके सर,बोबडे सर,नागरे सर,नरके सर,मोरे सर,आहिरे सर,मोमिन मॅडम,कय्युम शेख सर,वि.डी.पाटील सर,मकासरे सर,आर,डब्लु.पाटील सर आदी उपस्थित होते. शिक्षकवृंदानी केलेल्या मनोगतामध्ये त्यांना या बॅचचा खूप अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आणि जीवन सार्थक झाले असे म्हणाले. यावेळी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन केले. या ग्रुपच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप डुकरे व इम्तीयाज शेख तर प्रस्तावना वनिता भाकरे व अश्विनी शेळके यांनी केले व आभार कुणाल डुकरे व जावेद शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रुपच्या सर्व मित्र मैत्रिणींनी सहकार्य केले.