★हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी
बीड | प्रतिनिधी
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी गेवराईच्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी ही सोनवणे यांनी केली आहे.मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी व कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाच्या आवारात चोप देणारे अमोल खुणे यांच्यावर सोमवारी (दि.१५) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तीन ते चार इसमांनी दगडफेक करीत भ्याड हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांच्यावर गेवराईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी महाविकास उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अमोल खुणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी भेटून उपचार व त्यांच्या प्रकृती विषयी माहिती जाणून घेतली. या हल्ल्याचा निषेध करीत या प्रकरणाची चौकशी करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ही बजरंग सोनवणे यांनी केली आहे.यावेळी त्यांच्या सोबत पूजा मोरे, बालासाहेब जाधव, मुकुंद कणसे, कपिल मस्के, नवनाथ अंबाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.