संत वामनभाऊंनी समता आणि बंधुत्वाचा मंत्र दिला – फडणवीस
★गडाची प्रतिष्ठा पुढाऱ्यामुळे नाही; तर गरीब भक्तांमुळे – धनंजय मुंडे
पाटोदा | सचिन पवार
‘मानवतेचे महान पुजारी म्हणून अलौकिक कार्य करणारे संत वामनभाऊ महाराज यांच्या अत्यंत पवित्र श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर सेवेकरी होण्याचा मान दिला याबद्दल गडाच्या चरणी मी नतमस्तक होतो, असे विनम्रपणे सांगत मी उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे; तर एक सेवेकरी म्हणून येथे आलो आहे! लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेल्या संस्कारातून समाज बांधिलकी आणि अध्यात्माचे कार्य करीत आहोत. गडासाठी यापूर्वीच्या 25 कोटी रुपयांचे कामे तर करूच; पण नवीन बजेटमध्ये आणखी 25 कोटी रुपये देऊ.. आणि गडाचा विकास आराखडा पूर्ण करू! असा विश्वास देत आणि संत वामन भाऊंच्या कार्याची थोरवी वर्णन करत मनुष्याचला संकटावर मात करण्याची ताकद खऱ्या अर्थाने अध्यात्म देते, संत वामनभाऊंनी समता आणि बंधुत्वाचा मंत्र दिला!’ असे मौलिक उद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले; तर आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा असा आहे. मी अपघातातून वाचलो ही केवळ वामन भाऊंची कृपा आहे असे सांगून हा गड पुढाऱ्यामुळे नाही, तर गोरगरीब ऊसतोड कामगार भक्तांमुळे आहे, असे वास्तव राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अधोरेखित केले.
समतेचे पाईक महान संत वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांचा 48 व्या पुण्यतिथी सोहळा बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथ गडावर आज शनिवारी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावरून भक्तांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज, वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, आमदार राम शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश आण्णा धस, मा. आ. भीमराव धोंडे, आ. मोनिका राजळे, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब मुरकुटे, राजस्थानचे ह.भ.प.उत्तमसिंह महाराज, जिल्हाधिकारी दीपा- मुधोळ मुंडे, राजेश्वर चव्हाण, धनराज गुट्टे, विजय गोल्हार, सुवर्णाताई लांबरुड,अजय दादा धोंडे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रथेप्रमाणे पहाटे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामन भाऊंच्या चरणी महापूजा करण्यात आली.यावेळी सकाळी जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. महाराज यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. ११:४५ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, संत वामनभाऊ महाराजांनी मानवतावादी महान कार्य केले. गडाच्या विकासासाठी महंत विठ्ठल महाराजांची मोठी तळमळ आहे. गडासाठी सभागृह स्वागत कमान, प्रसादालय, भव्य कीर्तन मंडप आणि इतर सुविधा करण्यासाठी येत्या बजेटमध्ये 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. गडाची महान परंपरा आहे. येथे लाखो भक्त श्रद्धेने आशीर्वादासाठी येतात. प्रत्येकाची इच्छा ही भाऊंच्या आशीर्वाद मिळवण्याची असते. आणि म्हणून भाविक भक्तांच्या सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संकटांवर मात करण्याची ताकद अध्यात्मात असून संतांनी माणुसकीचा मंत्र दिला. जीवनात वारीचे महत्त्व विशद करताना त्यांनी वारीचा मार्ग गहिनीनाथ गड ते पंढरपूर सुकर व्हावा यासाठी चांगला मार्ग तयार करू असा विश्वास देत पंढरपुरात वारकऱ्यांसाठी मिळाली आहे त्यासाठी निधी कसा तयार करायचा ते बघू. मी खऱ्या अर्थाने ऊर्जा घेण्यासाठी येथे आलो असा विनम्र भाव त्यांनी व्यक्त केला. यावेळी पंढरपूरची जागा देणाऱ्या भक्तांचे स्वागत गहिनीनाथ गड आणि मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. वारकरी संप्रदायाचा मंत्र आपण सर्वजण जपू या.. एकत्र राहूया आणि भाऊंच्या आशीर्वादा खाली आनंदी मार्ग धरू असे सांगत शेवटी येथून पुढे बोलावले नाही तरी दरवर्षी गहीनाथ गडावर येणार.. अशी भावनिक साद घालताच प्रचंड टाळ्यांचा गजर झाला.कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, गेल्या वीस वर्षापासून गडाचा पूजेचा मान मला मिळतोय. मी भाग्यवान असून आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. मी अपघातातून वाचलो ही भाऊंचीच कृपा असून आज माझी भगिनी खासदार डॉ.प्रीतम ताई आणि मी सोबत आलोत पटलं का? असा जाहीर प्रश्न उच्चारताच प्रचंड टाळ्या वाजवून भाविक भक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सेवेसाठी मला भाऊंनी येथे आणले. वारकरी संप्रदायाची सुरुवात गडा पासून झाली. येथील भक्त गरीब विविध जाती पंथांचे ऊसतोड कामगार पण पुण्यतिथीला येणारच ही त्यांची निष्ठा असते.गड पुढार्यामुळे नाही तर गरीब ऊसतोड कामगार भक्तामुळे आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.यावेळी खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे म्हणाल्या, महिलांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सौंदर्य आले आहे.हा माझा कार्यक्रम असून भक्ती भावाने येथे येतो पंकजाताईंनी आर्थिक मदत दिली. गडाचे विकासासाठी योगदान देण्यात आम्ही कधी कमी पडणार नाहीत.जयदत्त क्षीरसागर म्हणाले,विविध संप्रदायांनी माणुसकी जतन केली. संत वामन भाऊंनी मानवतेचा उद्धार केला. जाती तोडा आणि समाज जोडा हा संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. ह भ प उत्तम सिंह महाराज राजस्थान यांनी जीवनाचा उद्धार करण्याचे हे ठिकाण असून संत आणि देव यातील फरक सांगितला. वंचित चे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी गडाचे वैभव मोठे असून महंतांनी मोठी परंपरा चालवल्याचे गौरव करत समता ऐक्य आणि बंधू भावाने राहण्याची अपेक्षा केली.केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव योजनेचा पहिला लाभार्थी ठरलेल्या पवार नामक व्यक्तीचा यावेळी प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. तसेच गहीनीनाथ गडावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केल्याबद्दल डॉ.नेहरकर यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य धनराज गुट्टे, जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे, कालिदास खेडकर, बबन तात्या ढाकणे, सुभाष खेडकर,हभप ॲड.महारुद्र नागरगोजे, संतोष घोडके, बबन सांगळे, मारुती सांगळे, धर्मराज सांगळे, संतोष मानूरकर, उत्तम बोडखे, महाराष्ट्र मुप्टा असोसिएशनचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.बिभिषण चाटे, संजय सानप, अनिल गायकवाड, प्रभाकर सुळे आदीसह राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक क्षेत्रासह माध्यम प्रतिनिधी सह राज्यासह देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक भक्त उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या नियंत्रणात पोलीस विभागाने चोख कर्तव्य बजावले. आरोग्य, परिवहन विभागानेही सहकार्य केले. प्रस्ताविक गडाचे महंत विठ्ठल महाराजांनी केले. सूत्रसंचालन शंकर देशमुख तर शेवटी गडाच्यावतीने आभार मानण्यात आले.
★पंकजाताईंची अनुपस्थिती; भक्तगण व्याकुळ!
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती ही परंपरा होती. त्यांच्यानंतर ही परंपरा मुंडे घराण्यातील पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून जोपासली जाते. प्रतीवर्षी पंकजाताई यांचे भाषण भाविक भक्तांसाठी ऊर्जा देते. परंतु यंदा अनुपस्थिती राहिल्याने भाविक भक्तांची व्याकुळता लपून राहिली नाही.
★वामनभाऊंच्या आशीर्वादाने लाखो भक्तांना ऊर्जा!
यंदाच्या 48 व्या संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला लाखो भाविक भक्त यांसह महिलांची उपस्थिती होती. वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठी रांग लागली होती. गडावर भव्य यात्रेचे स्वरूप होते. महंत विठ्ठल महाराजांच्या मार्गदर्शनातून पुण्यतिथी सोहळा यशस्वीपणे पार पडला.