★सेवापूर्ती समारंभाला अधिकारी कर्मचार्यांसह महिला भगिनींची मोठी उपस्थिती
बीड | प्रतिनिधी
‘आयुष्य हा संघर्ष नसून एक संधी आहे; प्रशासनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने कर्तव्य निभावल्यास जनता जनार्दनाची उत्तम सेवा घडू शकते हे आदर्श पर्यवेक्षिका जयश्रीताई बेद्रे यांनी दाखवून दिले आहे !’ असा गौरव महिला व बालकल्याण विभाग बीडच्या प्रकल्पाधिकारी सौ.सुनंदाताई तांदळे यांनी केला.
महाराष्ट्र शासनाच्या बीड जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभागात पर्यवेक्षक पदावर तब्बल 29 वर्ष सेवा कार्य निभावल्यानंतर आज रविवारी बीड येथे सेवापुर्ती समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सौ. सुनंदाताई तांदळे बोलत होत्या. मंचावर नगरसेवक सुशील कोठेकर, शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम जाधव, गव्हाणे साहेब, माजी जि प सदस्य बंकटराव शिंदे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पाटोद्याच्या सुनंदाताई गर्जे, विठ्ठल नाना तांबे, शिवरामजी उबाळे आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी सरस्वती देवी, माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.सुनंदाताई तांदळे पुढे म्हणाल्या, जयश्रीताई बेद्रे पाटील यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पर्यवेक्षक म्हणून केलेली 29 वर्षे सेवा विभागातील इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा वाढवणारी आहे.यावेळी सुशील कोठेकर, गव्हाणे साहेब, बंकट शिंदे, तुकाराम जाधव, विठ्ठल नाना तांबे, प्रा.बिभिषण चाटे, प्रा. सचिन सानप, कादर सय्यद सर, शेख मॅडम, बडे मॅडम आदींनी मनोगतात सौ.जयश्रीताईंना शुभेच्छा दिल्या.सेवापूर्ती समारंभाला निरगुडीचे सरपंच शिवाजी शेलार, बाळासाहेब वीर, मारुती माने, बि.डी. चव्हाण, हनुमान शेलार, बाळासाहेब बेद्रे ,दीपक कदम, संतोष बेद्रे, विठ्ठल बिनवडे, प्रा.आशा फड-चाटे, रुपेश राजे बेंद्रे पाटील, निलेश राजे बेद्रे पाटील आदी सह महिला बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक बेद्रे सर यांनी; सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद तर आभार प्रदर्शन साहेबराव बेद्रे पाटील यांनी केले.
★आईमुळे माझी ओळख- रुपेश बेद्रे
आई जयश्री ताई बेद्रे यांनी अत्यंत प्रतिकूल आणि संकट काळातून आम्हाला लहानाचे मोठे केले.. संस्कार दिले.. शिक्षण दिले.. अथक परिश्रमातून स्वतः शासकीय नोकरी करत तारेवरची कसरत केली. आईने दिलेले संस्कार यामुळेच आम्ही आहोत, असे सांगत आई मुळेच माझी ओळख असल्याचा विनम्र भाव रुपेश बेद्रे यांनी व्यक्त केला.