★गुणवत्ताधारक मल्लांनी पुढे यावे – राहुल आवारे
बीड | प्रतिनिधी
शिक्षणापेक्षा खेळाला महत्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळया खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविणार्या खेळाडूंना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. क्रिडा क्षेत्रात आता फार मोठा बदल झाला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले तर आपल्या जिल्ह्यात खुप चांगले पैलवान आहेत. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे अशा मल्लांनी पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक राहुल आवारे यांनी केले.
सोमवार दि.23 रोजी कै.सोनाजीराव (नाना) क्षीरसागर क्रिडा मंडळ व्यायाम शाळा, तालुका दूध संध परिसर मंझरी फाटा येथे महाराष्ट्र केशरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे बंकटस्वामी मठ नेकनूर, पोलीस उपअधिक्षक अर्जुन वीर व छत्रपती पुरस्कार विजेते राहुल आवारे, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, विलास बडगे, अरूण डाके, सुग्रीव रसाळ, नानासाहेब काकडे, कल्याण खांडे, शेख अलफिया जब्बार, कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा चव्हाण, उपाध्यक्ष सोमा गायकवाड, सचिव बाळासाहेब आवारे, सहसचिव शेख इसाक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, पुर्वीच्या काळी नाना दरवर्षी कुस्तीचा फड भरवायचे त्यावेळी राज्यातून, परराज्यातून अनेक नामांकित पैलवान यायचे. बाळासाहेब आवारे यांची राजुरीच्या फडात शेवटची कुस्ती असायची. त्यावेळी बाळू बग हे पोरगं कुस्तीत चांगलं चमकेल असं नाना राहुल आवारेच्या वडलांना म्हणायचे. क्रिडा क्षेत्रात काळ बदलला आहे. लिखोगे पढोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनेंगे खराब असे त्यावेळी सांगितले जायचे. आता परिस्थिती बदललेली आहे, शिक्षणापेक्षा खेळाला मोठे महत्व आले असून खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवले तर खेळाडूंनी केलेल्या कर्तत्वाची नोंद म्हणून केंद्र व राज्य सरकारमध्ये चांगल्या नोकर्या दिल्या जात आहेत. मॅट आणि मातीवरपण कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या जातता. खेळाडूंना ताकतीबरोबर खुराक दिला तर चांगले क्रिडापटू तयार होतात. अनेक खेळाडू बीडच्या काळ्या मातीतून गेले आहेत. तरूण खेळाडूंना, कुस्तीपटूंना प्रेरणा, स्फुर्ती मिळाली पाहिजे. ग्रामिण भागातून अनेक मुले खेळातून आपले नाव कमवीत आहेत. कुस्तीची खुप जुनी परंपरा आहे ती परंपरा महाराष्ट्राच्या काळ्या आणि लाल मातीने जतन केली आहे. यातून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. कुस्ती हा ताकतीचा खेळ आहे यात चपळाई लागते. महाराष्ट्रातून जिल्ह्यातून अनेक चांगले पैलवाहन तयार झाले आहेत. पुर्वी दवंडीची कुस्ती असायची ती कुस्ती बाळू आवारे खेळून जिंकायचे. स्पर्धेत चिकाटी महत्वाची आहे गुणवत्तेने कलागुण, चपळाई, युक्ती याचा संगम झाला तर यश अवघड नाही. कुस्ती हा खेळ ग्रामिण भागाने जोपासलेला आहे. कुस्तीसाठी बलदंड राहणे महत्वाचे आहे. तरूण खेळाडूंना पेे्ररणा मिळावी म्हणून राहुल आवारे यांना निमंत्रीत केले. यापुढे होणार्या कुस्ती स्पर्धेत बीडचे नाव गाजावे अशा शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना दिल्या.पुढे बोलताना राहुल आवारे म्हणाले की, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आण्णांनी मला येण्याचा आगृह केला, आण्णांना मी लहानपणापासून ओळखतो. नवगण राजुरीच्या फडात लहाणपणी मी कुस्ती खेळत असताना नानांनी माझ्या वडीलांना सांगितले की, हा मुलगा कुस्तीत चांगला बनणार आहे. त्याकडे तू लक्ष दे. आण्णांनी नानांच्या नावाने कुस्तीची तालीम सुरू केली असून याचा ग्रामिण भागातील मल्लांना फायदा होणार आहे. तुमचे आशिर्वाद अणि प्रेमामुळे मी पुढे आलो आहे. अनेक पैलवन जिल्ह्याने दिले आहेत. आपल्या जिल्ह्यात चांगले पैलवान आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. आण्णा आणि क्षीरसागर कुटूंबियांचं माझ्या आयुष्यात खुप मोठे योगदान आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. इंदापूर येथे सईद चाऊस यांना महाराष्ट्र केशरी पुरस्कार दिला त्यावेळी माझा 57 किलो वजनगटात प्रथम क्रमांक आला. तेंव्हा आण्णांनी माझी आणि चाऊस यांची मिरवणूक काढून मला 51 हजाराचे बक्षीस दिले. त्यावेळी दिलेले प्रोत्साहन आजपर्यंतच्या प्रवासाला मोठा हातभार लागला. वेळावेळी वेगवेगळ्या स्पर्धा असतील कुस्त्या जिंकल्या, मेडल मिळविले त्या प्रत्येक वेळी आण्णांनी माझ्या पाठीवर शाब्बाशकीची थाप टाकली. या भागाने आर्थिक मदत करून प्रेम दिले, तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी यशस्वी झालो. माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार, माझे वडील बाळासाहेब आवारे यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले असे ते म्हणाले. यावेळी कुस्तीगिर मल्ल, युवक, पुरूषांची उपस्थिती होती.