कुसळंब मध्ये महामानवांच्या विचाराची शिदोरी !
★मराठा आरक्षणाच्या निर्णयाला कुसळंबच्या मागासवर्गीयांचा जाहीर पाठिंबा!
कुसळंब | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा अति जिव्हाळ्याचा झाल्याने मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी मोठा प्रतिसाद देऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन अतितीव्र स्वरूप धारण करत आहे. हेच मराठा समाजाच आंदोलन मोडकळीस काढण्यासाठी शासनाने कुटील डाव टाकला आणि ग्रामपंचायत निवडणुका लावल्या परंतु याला देखील मराठा समाज आणि इतर समाजाने केराची टोपली दाखवत सरकारचा निषेध नोंदवत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कुसळंब ग्रामस्थांनी देखील मोठा निर्णय घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकत सर्वांनी राजीनामे दिले त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला सरपंच पदाच आरक्षण असल्याने मागासवर्गीय समाजाला देखील विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार देत मराठ्यांचा शब्द आणि भंडाऱ्याचा मान राखत मनाचा मोठेपणा दाखवत बहिष्कार टाकला आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. मागासवर्गीय समाजाच्या या मोठ्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
पाटोदा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत कुसळंब येथील सर्व सदस्यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत असं जाहीर करून राजीनामे दिले. यामध्ये मागासवर्गीय समाजाने देखील मनाचा मोठेपणा दाखवत आणि मराठ्यांचा शब्द आणि भंडाऱ्याचा मान राखत निवडणुकीवर बहिष्कार टाकवण्याचं जाहीर केले त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे तसेच सकल मराठा समाजाकडून सर्व मागासवर्गीय समाजाचे सुद्धा आभार व्यक्त केले जात आहे.
★कुसळंबच्या मागासवर्गीयांचा आदर्श घ्यावा
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि कुसळंबाचं आराध्य दैवत असलेलं खंडेरायाच्या भंडाऱ्याचा मान राखण्यासाठी मागासवर्गीय समाजाने देखील मोठ्या मनानं मराठा समाजाने टाकलेल्या बहिष्काराचे स्वागत करत आम्ही देखील मराठा समाजाच्या सोबत आहोत असं जाहीर करत मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही देखील बहिष्कार टाकत आहोत असं जाहीर केले. महामानवांच्या विचाराची शिदोरी काय असते हे मागासवर्गीय आणि मराठा समाजाने दाखवून दिले. हा आदर्श कुसळंबकरांनी सर्व समाजाला दिला आहे.
★सकल मराठा समाजाकडून मागासवर्गीयांचं जहीर आभार
कुसळंब ग्रामपंचायतीच सरपंच पद हे मागासवर्गीय समाजासाठी असले तरी मराठा समाजाने घेतलेला बहिष्कारचा निर्णय आणि खंडोबा मंदिरामध्ये झालेला निर्णय हा अंतिम समजला जातो हे सर्व समाजाला मान्य असते याची पुनरावृत्ती सध्या संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळत आहे. मागासवर्गीय समाजाने मनाचे मोठेपण दाखवल्याबद्दल सकल मराठा समाजाकडून त्यांचे देखील जाहीर आभार व्यक्त केले जात आहे.