★जयदत्त क्षीरसागरांनी श्रेय लुटीच्या जुन्या खोडीला आवर घालावी – महेश सावंत
बीड | प्रतिनिधी
गेली पंचवीस वर्षापासून स्वयंघोषित विकास पुरुषाचा टेंबा मिरवणाऱ्या जयदत्त क्षीरसागरांना राजकीय यशाचा गुलाल लिंबागणेश जिप गटातील जनतेने प्रथम दिला. हाती सत्ता असताना, राजकीय स्वार्थ लक्षात घेऊन, मतावर डोळा ठेऊन कामे केली. विकासातील स्वार्थी राजकारण आणि फुकटचे श्रेय घेण्याची घाणेरडी सवय जनतेला माहीत आहे. काळ बदलला, युवकांनी राजकारणाची धुरा सांभाळली. उठ – सूठ मंजूर कामांच्या याद्या पाहून पेपरला बातम्या देऊन, स्वतःहून स्वत:ची पाठ थोपटणे बंद करा. श्रेय लुटीच्या जुन्या खोडीला आवर घाला असा सुचक सल्ला भाजपा लिंबागणेश सर्कल प्रमुख महेश सावंत, दादासाहेब खिल्लारे, नागझरी सरपंच महादेव नैराळे, शरद बडगे, आबा येळवे, ग्राप सदस्य सतीश कळसुले यांनी दिला आहे.
लिंबागणेश जिल्हा परिषद गटाच्या जि.प. सदस्या तथा माजी उपाध्यक्षा सौ. जयश्री राजेंद्र मस्के यांनी लिंबागणेश गटातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत रस्त्यांची सुविधा निर्माण केली. प्रत्येक गावाच्या विकासासाठी सातत्याने त्यांचा पाठपुरावा चालू आहे. 09 नोव्हेंबर 2022 रोजी तत्कालीन पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांना बीड मतदार संघातील 11 कामे मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करणे करिता विनंती केली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कामांची निवड होऊन, राज्य शासनाकडे शिफारसीत होते. ही प्रक्रिया पूर्ण करून, राजेंद्र मस्के यांनी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्यातून वरील दोनही रस्ते मंजूर करून घेतले आहेत. 29 मार्च 2023 रोजी या दोनही कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त असून, इजिमा – 115 ते नागझरी बेलखंडी रस्ता 6.300 किमी करिता 494.47 लक्ष रुपये तर इजिमा 115 ते पोखरी रस्ता 1.850 किमी करिता 89.39 लक्ष रुपये येवढा निधी मंजूर झाला. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. दसरा दिवाळी दरम्यान कामाचा शुभारंभ करण्याची तयारी ही पूर्ण झाली. दरम्यान 16 जून 2023 रोजी बूथ संपर्क अभियान निमित्ताने तत्कालीन पालकमंत्री अतुलजी सावे हे बेलखंडी येथे आले असता, मिडीयाच्या साक्षीने ग्रामस्थांनी पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचा रस्ता मंजूर केल्याबद्दल सत्कार करून आभार व्यक्त केले होते. आज अचानकच ऐकीव,अर्धवट माहितीच्या आधारावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना श्रेयाची उबळ आली. काहीही प्रयत्न न करता अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करणे शोभत नाही. यापूर्वी अनेकदा असे श्रेय लुटीचे प्रकार घडले आहेत. असे ओंगळ प्रकार पुन्हा घडू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन महेश सावंत, दादासाहेब खिल्लारे यांनी केले आहे.