24.9 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

साडेतीन कोटी मराठे आधीच कुणबी मराठा!

★मराठ्यांना अशी संधी पुन्हा नाही ; मराठा म्हणून एकजूट राहा – मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वृत्तांत

राज्यातील पाच कोटी मराठे ओबीसीमध्ये आले तर आमचे आरक्षण कमी होईल, अशी भीती ओबीसी समाजाला दाखविण्यात येत आहे. पाच कोटी मराठ्यांपैकी विदर्भ, खान्देश, कोकणपट्टा, शेवगावपासून ते पाथर्डीपर्यंतचा सुमारे साडेतीन कोटी मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहेच. उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठ्यांनी तुमचे काय घोडे मारले, असा सवाल करीत मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, फक्त मराठा समाजाने एकजुटीने राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल येथे मंगळवारी रात्री आयोजित जाहीर संवाद सभेत ते बोलत होते. नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा सुरू झालेल्या सभेसाठी शहर आणि ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी विभागीय क्रीडा संकुलावर गर्दी केली होती. जरांगे पाटील यांचे 8 वाजता आगमन होताच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी क्रीडा संकुल दणाणले. जरांगे म्हणाले की, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. शांततेने उपोषण करणाऱ्या माता-भगिनींवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला. एवढेच नव्हे तर आमच्यावरच कलम 307, 120 सारखे गुन्हे नोंदविले. या घटनेनंतर मराठा समाज एकवटला आणि सरकारने आरक्षण देण्याची तयारी दाखवित आपल्याला एक महिन्याची मुदत मागितली. आपणही मराठा समाजबांधवांशी सल्लामसलत करून 40 दिवसांची मुदत दिली. ही मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. तत्पूर्वी आपल्याला 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे सभा घेऊन सरकारला ताकद दाखवायची आहे. सुरुवातीला किशोर चव्हाण यांनी जरांगे यांच्या रुपाने सच्चा कार्यकर्ता समाजाला लाभल्याचे नमूद केले. विजय काकडे आणि सुनील कोटकर यांनी सूत्रसंचालन केले.

★छगन भुजबळांवर टीका नाही

मराठा आरक्षणाला विरोध करीत असल्यामुळे मी त्या मंत्र्यांवर टीका केली. आमच्याच हक्काचे आरक्षण खायचे आणि पुन्हा त्यावर मालकी सांगायचे हे चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. त्यांनी आता आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे सांगितले. यामुळे मीपण त्यांच्यावर टीका करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

★तीन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था, यामुळे वाहतूक कोंडी टळली

सभेसाठी आलेले सर्व मराठा बांधव आणि भगिनी सायंकाळी 5 ते 8 पर्यंत सभास्थळी बसून जरांगे यांची प्रतीक्षा करीत होते.मनोज जरांगे पाटील सभास्थळी येताच उपस्थितांनी उभे राहून आणि मोबाइल बॅटरी चमकावून त्यांचे स्वागत केले.सभेसाठी एसीपी रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलिस निरीक्षक सुशील जुमडे यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक आणि ३० एपीआय, पीएसआय,127 पोलिस, 23 महिला पोलिस आणि दोन आरसीपीच्या तुकड्या तैनात. विविध मराठा कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि फरसाणचे वाटप केले. बाहेरगावाहून आलेल्या मराठा बांधवांसाठी आयोजकांनी भोजनाची व्यवस्था केली होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!