अखेरचा संवाद!
★शहीद जवान पांडुरंग तावरे यांनी घटनेपूर्वी पत्नी-मुलांशी साधला होता संपर्क
बीड | सचिन पवार
सहकाऱ्यांनी सांगितले, ते जीपच्या टपावर शेवटचे दिसले; आज काकडहिऱ्यात अंत्यसंस्कार युद्ध सराव संपला आहे. आता मी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलोय, बाकीचे लोक खोल्यांमध्ये तर मी जीपमध्ये झोपणार आहे. दिवाळीला मी गावी येतोय, अशा शब्दांत शहीद जवान पांडुरंग तावरे यांनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता पत्नी तेजस्विनी (गोदावरी) सोबत संवाद साधला होता, तर पप्पा येताना फटाके घेऊन या, असे म्हणत मुलगा मेघराज (१२) व विराज (६) यांनी त्यांना फटाक्यांची यादी पाठवली होती. या फोननंतर अवघ्या काही तासांत तावरे थांबलेल्या ठिकाणी पूर आला आणि ते बेपत्ता झाले. ४ दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळला. सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर काकडहिरा या मूळ गावी अंत्यसंस्कार होतील.
काकडहिरा (ता. पाटोदा) येथील पांडुरंग वामन तावरे (३५) हे २००९ मध्ये भरती झाले. नायक या पदावर ते कार्यरत होते. त्यांनी दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, मध्य प्रदेश, लेबनॉन, पंजाब या ठिकाणी सेवा केली होती. दोन महिन्यांपूर्वी ते गंगटोक येथे ते गेले होते. युद्ध सराव संपवून ते कॅम्पवर मुक्कामी आले होते. सर्व जवानांसाठी लष्कराने खोल्यांची व्यवस्था केली होती. मात्र, तावरे हे वाहन चालक असल्याने वाहनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते वाहनातच मुक्कामी थांबले होते. मध्यरात्री ढगफुटी होऊन पूर आला. यात तावरे बेपत्ता झाले होते.
★आम्ही उड्या टाकल्या, ते टपावर चढले
दरम्यान, तावरे यांच्यासोबत असलेल्या जवानांनी तावरे कुटुंबाला या घटनेची माहिती देताना सांगितले की, पूर आल्यानंतर आम्ही वाहनांमधून उड्या टाकून जीव वाचवला, तर पांडुरंग हे जीपच्या टपावर चढले होते. तिथेच आम्ही त्यांना शेवटचे पाहिले.