★समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.सभापती – किरण शिंदे पाटील
सौताडा | प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाने अनेक पक्षांचे सरकार निवडून आणले मराठा बहुल खासदार, आमदार शासनदरबारी असताना व फक्त आश्वासनांची खैरात करण्यात आली परंतु प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसी मधुन कायद्यात बसणार आरक्षण देण्यात सर्वच सरकार अपयशी ठरले. मराठा समाजाने आतापर्यंत शरद पवार,अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली.बीड जिल्हयातील पाटोदा तालुक्यातील सौताडा हे चळवळीचं गाव आहे,येथील क्रांतिकारी चळवळीतील मराठा युवकांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चामध्ये मोटार सायकल,बैलगाडी,ट्रॅक्टर सह शालेय विद्यार्थी,महिला,पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.हा मोर्चा अतिशय शिस्तीने आणि शांततामय मार्गाने वांजरा फाटा ,येवलवाडी ,धनगरजवळका,चुंबळी फाटा असा मार्गक्रमण करत करत पाटोदा तहसील कार्यालयात पोहचणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सौताडा येथील शेकडो मराठा तरुणांनी दिनांक ९ सप्टेंबर पासून साखळी उपोषण चालू असून आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही असा इशाराच येथील सकल मराठा तरुणांनी दिला असून जरांगे पाटील यांनी सरकारला सरकारला ४० दिवसांची मुदत संपत असुन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणी करिता बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता पाटोदा तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण आणि साखळी उपोषणास बसले आहेत. याची संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजामध्ये जनजागृती दिसून येत आहे.
मराठा समाजामध्ये सरकार च्या विरोधात तीव्र संताप असून विशेष करून सर्व मराठा समाजाच्या नेत्यांविषयी चीड निर्माण झाली आहे ,मराठा समाजाचे अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी या आरक्षण आणि उपोषण या विषयाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले म्हणूनच अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे यामध्ये आत्महत्या करण्याचा अवलंब बहुसंख्य मराठा बांधवांनी केला असून, मराठा समाजाच्या नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून ५०% च्या आत आरक्षण मिळावे याकरिता सर्व पक्ष आणि संघटना याचे नियम बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले पाहिजे असे मत तरुणांमध्ये तयार झाले आहे.
“आता नाही तर कधीच नाही “आरक्षण आमच्या हक्काचं असे म्हणत मराठा नेते आणि लोकप्रतिनिधी आमच्या सोबत रस्त्यावर उतरले नाहीत तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीत आपआपली जागा दाखवू अशा प्रकारचा प्रचंड असंतोष समाजामध्ये तयार झाला असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने देखील मराठा समाजाचाअंत पाहू नये कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण हवे आहे असे रुद्र रूप मराठा बांधवाच्या तरुणांनी घेतल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून तालुक्यातील दिनांक २ सप्टेंबर पासून डोंगरकिनी या ठिकाणी अनेक समाज बांधव अमरण उपोषणास बसले होते, सौताडा, मुगगाव या ठिकाणी देखील सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरु केले आहे. मनोज जारांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, या सह लाखोंचे मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने तमाम मराठा समाजातील बंधू भगिनीवर पोलिसांमार्फत लाठचार्ज करून, गोळीबार आणि अश्रूधुराचे नळकांडे फोडून महाराष्ट्राला काळीमा फासला आहे. मराठा समाज अत्यंत शांततेने आणि संयमानी आंदोलन करत असून मराठा समाजाचा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी सर्व समाज बांधवाकडून होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून घोळत असलेला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारवरच असेल असे मत सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त होत आहे.या धडक मोर्चा संदर्भात उपविभागीय अधिकारी पाटोदा,तहसीलदार साहेब पाटोदा,त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पाटोदा यांना निवेदन दिली आहेत या धडक मोर्चासाठी पाटोदा तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती किरण शिंदे पाटील यांनी केले आहे.