★सौताडा धबधबा ओसंडून वाहू लागला, पर्यटकांचा आनंद द्विगुणित
पाटोदा | सचिन पवार
जामखेड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले सौताडा येथील रामेश्वर दरीमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला रामेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे येथील निसर्ग खुलला आहे. दरवर्षी पर्यटक येथील हे दृश्य पाहण्यासाठी आतुरतेने या प्रसंगाची वाट पाहत असतात.
जामखेडहुन बीड कडे जाताना सौताडा घाट ओलांडला की लगेचच सौताडा हे गाव लागते. गावालगतच रामेश्वर दरी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी महिनाभर भाविक येत असतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी येथील यात्रा असते. दर्शनासाठी आलेल्या भक्तांना येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. श्रावण महिन्यामध्ये येथील वातावरण अतिशय नयनरम्य असते. संपूर्ण दाट झाडी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी व खोल दरीत कोसळणारा धबधबा हे दृश्य अतिशय मनमोहक असते. आलेले भक्त श्री रामेश्वराचे दर्शन घेण्याबरोबरच येथील निसर्गाचा आनंद घेतात. भाविक भक्तांबरोबरच येथे हौशी पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी असते.राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा सौताडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोल दरीतील धबधबा गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने वाहू लागला आहे. चार दिवसा पासून सुरु झालेल्या पावसाने धबधब्याचे रौद्ररूप पर्यटकांना पहावयास मिळाले मराठवाड्याचा अर्ध्याहून अधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा, सिंदफना , विंचरणा , बिंदुसरा , डोमरी या नद्यांचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाळा संपत आला असताना पावसाने जोर धरला आहे.विचाराना या नदीच्या उगमापासून राज्यात प्रसिद्ध असलेल्या सौताडा येथील रामेश्वर पर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवर सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव , भुरेवाडी , लांबरवाडी ,मुगगाव अशी तलावांची मालिका आहे. उगमस्थानापासून सौताडा पर्यंत वरचे चार तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही. व हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशियाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही.चालू वर्षी शेवटच्या टप्प्यात पाटोदा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू झाला. त्यातच मराठवाड्याचा मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा हा सध्या झालेल्या झालेल्या पावसामुळे सध्या धो धो वाहात आहे.
★अप्रतिम निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ!
अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालीत असुन हे सौंदर्य ‘ याची देही याची डोळा ‘ पाहण्यासाठी परतीच्या पावसाने पर्यटकांना खुणावणारा धबधबा यथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. तालुक्यातील हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध व निसर्गरम्य आहे.
★सौताडा येथील रामेश्वर धबधबा!
येथील लाभलेलं अप्रतिम निसर्गसौंदर्य . हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करीत खोल दरीत धो धो. कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे, परतीच्या दमदार पावसामुळे हा धबधबा पुन्हा सुरू झाला व पर्यटकांना आकषित करु लागला आहे.