★सुरक्षितता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीच माहेरघर तेजस अर्बन
बीड | सचिन पवार
सर्वसामान्य ठेवीदार अतिशय विश्वासाने आपली पुंजी तेजस अर्बनमध्ये गुंतवत आहेत. या प्रत्येक ठेवीदाराचे हित जोपासणे आणि पारदर्शक व्यवहार ठेवणे हेच तत्व तेजस अर्बनने स्थापने पासून पाळले आहे. यामुळेच आज संस्था प्रगतीचे दिशेने घौडदौड करत आहे, असे प्रतिपादन तेजस अर्बनचे चेअरमन तथा बीड जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. प्रकाश कवठेकर यांनी केले.
बीड येथे रविवारी (ता.२४ सप्टेंबर) तेजस अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड बीडची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. याप्रसंगी ॲड.कवठेकर हे बोलत होते. व्यासपीठावर संचालक रामदास ठोसर , शिवाजी लोखंडे, दिनेश जाधव, दत्ता घरत, राजाभाऊ भोंडवे , नरसिंग आबा सिरसाठ यांची उपस्थिती होती.
ॲड.कवठेकर यांनी याप्रसंगी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील संस्थेचा ताळेबंद मांडला. गेल्या वर्षभरात संस्थेने अतिशय उत्तम कामगिरी केल्याने सभासद संख्येत वृध्दी होऊन सहा हजार ३३८ इतकी झाली आहे. संस्थेच्या राखीव निधीतही गेल्या वर्षभरात वाढ झाली असून सहा लाख ८१ हजार ४६० रूपयांवर पोहोचला आहे. बीड जिल्ह्यात पतसंस्थांबाबत संभ्रमाचे वातावरण झालेले असताना तेजस अर्बनने पारदर्शकता या मूळ व्यवहारावर कायम भर दिल्याने संस्थेच्या ठेवीतही वाढ झाली असून ती पाच कोटी ६३ लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, तेजस अर्बनच्या वतीने सर्वसामा्न्य ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांच्यासाठी विविध आकर्षक योजनाही राबवल्या जात आहेत. त्याचाही सामाजिक दृष्टिकोनातून लाभ होत असल्याचे ॲड.कवठेकर यांनी सांगितले.यावेळी सुत्रसंचलन दिणेश जाधव यांनी तर आभार सचिन घिगे यांनी मानले..
★ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षितेवर भर
संस्थेत विश्वासाने ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तेजस अर्बनने ६४ लाख ९९ हजार ६५१ रूपयांची गुंतवणूक शासनमान्य नामांकित संस्थेत केलेली आहे. तसेच संस्थेत चालु असलेले व्यवहार व इतर रोख रक्कम अशी ५० लाख रूपये शेष राशीही आहे. कर्ज, गुंतवणुकीवरील रक्कम हे सर्व पाहत गत आर्थिक वर्षात संस्थेला १० लाख रूपयांहून अधिक नफा झालेला आहे.
★पारदर्शकतेवर मोहर
संस्थेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ताळेबंद लेखा परीक्षक सहकारी संस्था यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले असून लेखा परीक्षक वर्गवारी १ यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत अ वर्ग प्रदान केलेला असल्याने पारदर्शकतेवर मोहोर उमटली आहे.
★सामाजिक बांधिलकीही जोपासली
तेजस अर्बनने शासनाच्या विविध योजनांना प्रोत्साहन देण्याचे काम गत आर्थिक वर्षात केले. स्थापनेपासून लोकाभिमुखता जोपासलेल्या तेजस अर्बनने ५० हून अधिक मयत खातेदारांच्या कुटूंबियांना मदत राशी व विम्याची मदत मिळवून दिली. यासोबतच जिल्ह्यातील कित्येक महिला बचत गटांना निधी देऊन स्वयंरोजगार व आर्थिक उन्नतीसाठी प्रोत्साहित केलेले आहे. याबाबत संस्थेचा शासन व विविध संघटनांकडून गौरवही झालेला आहे.