★तब्येत ठणठणीत करून पुन्हा लढायला तयार होणार – मनोज जरांगे
★थकवा व कफमुळे संभाजीनगरात उपचार घेण्यासाठी दाखल!
बीड | सचिन पवार
मी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. थोडीशी खालावलेली तब्येत 30 दिवसांत ठणठणीत करून पुन्हा आरक्षणासाठी लढायला तयार होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले. जरांगे पाटील यांना 15 वर्षांपासून पाच ते सात दिवसांचे उपोषण करण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर एवढा मोठा परिणाम झाला नाही. त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. थोडासा कफ व थकवा असून त्यावर उपचार करण्यासाठी 2 दिवस दाखल करून घेतले आहे, अशी माहिती गॅलक्सी रुग्णालयाचे डाॅ. विनोद चावरे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेतले. शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्यावर मुंबईत किंवा छत्रपती संभाजीनगर येथील चांगल्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांना 17 सप्टेंबर रोजी सकाळी गॅलक्सी रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात दाखल करण्यात आले. या वेळी मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला गराडा घालून जरांगे पाटील यांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या.
★जरांगे पाटलांना भेटण्यासाठी रांगा!
जरांगे पाटील उपचारासाठी शहरात आल्याचे कळताच मराठा आंदोलकांसह समाजातील लोकांनी त्यांची भेट घेण्यासाठी रांगा लावल्या. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना वेगळा रस्ता द्यावा, भेटी देणाऱ्या लोकांना अडवू नका, 5 जणांच्या ग्रुपने भेटायला पाठवा, असे जरांगेंनी सांगितले.