आपण बोलून निघून जायचं…
होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..
केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर
आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं
जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…
लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती
आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं
लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..
चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत
खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं
कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..
रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं
आपल्याला काय..
सौमित्र.