★पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना ; मायबाप सरकार पाऊस नाही तुम्ही तरी म्हणा !
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर वरूनराजा जणू नाराज झाला आहे. कुठेतरी पेरणी करून पिकांना उभारी मिळाली होती पण आता पाऊस लांबणीवर पडल्याने आणि तलावात थेंबच न गेल्याने शेतकऱ्यांपुढे पिकांना पाणी कसे द्यायचं हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तोंडाशी आलेला घास पुन्हा निसरत चालला आहे. माय बाप सरकार तुम्ही तरी आता म्हणा पाऊस नाही नाहीतर शेतकऱ्यांनी जे थोडेफार सासून ठेवलं होतं ते सुद्धा मातीत मिसळल्यासारखे होईल. जर पाऊस नाही आला तर हातचं गेलं आणि तोंडच पण गेलं अशी परिस्थिती शेतकऱ्याची होईल यात शंका नाही.
शेतकऱ्यांसमोर नेहमीच संकट उभी राहतात परंतु तरी शेतकरी राजा हार मानायला तयार नाही. संकटाचा सामना करायला 365 दिवस तयार असतो परंतु त्याला साथ द्यायला सरकार मात्र कमी पडत आहे. मायबाप सरकारने थोडाफार शेतकऱ्यांना आधार दिला तर शेतकरी खचणार तर नाहीच परंतु सरकारला आधार दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यावर आलेलं प्रत्येक संकट जेव्हा सरकार वाटून घेण्याचा प्रयत्न करेल तेव्हा शेतकरी नक्कीच झपाट्याने पुढे जाताना आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सुद्धा दोन पावले पुढे येऊन शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी मदत करून आधार द्यावा एवढीच शेतकरी वर्गातून अपेक्षा आहे.
★शेतकऱ्याच्या अडचणीवर कायमचा पर्याय निघेल का ?
रब्बी हंगाम असेल किंवा खरीप हंगाम असेल प्रत्येक वेळी शेतकऱ्यांसमोर नवनवीन प्रश्न संकट उभे राहतात परंतु प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतःलाच उभारी घेण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात मग सरकारचा उपयोग तरी काय ? शेतकरी सक्षम करायचं असेल तर सरकारने त्याच्या संकटावर काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कायमचं सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात हीच अपेक्षा पुन्हा पुन्हा समोर येत आहे.